आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राचा पराभव; अंकित बावणेचे शतक व्यर्थ, सौराष्ट्राचा ६३ धावांनी दणदणीत विजय

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदाबाद - येथे शुक्रवारी झालेल्या वरिष्ठ वनडे क्रिकेट स्पर्धेत सौराष्ट्राने महाराष्ट्रावर ६३ धावांनी विजय मिळवला. स्पर्धेतील हा महाराष्ट्राचा तिसरा पराभव ठरला. जबरदस्त फॉर्मात असलेल्या महाराष्ट्राच्या अंकित बावणेने नाबाद शतक ठोकले.

प्रथम फलंदाजी करताना सौराष्ट्राने ५ बाद ३०३ धावा काढल्या. प्रत्युत्तरात महाराष्ट्र निर्धारित षटकांत ८ बाद २४० धावा काढू शकला. सौराष्ट्राकडून मधल्या फळीतील व्ही. वासवदाचे शतक केवळ ४ धावांनी हुकले. सलामीवीर शेदान जॅक्सनने अर्धशतक झळकावले. त्याने ७४ चेंडूंत ५ चौकारांसह ५३ धावा काढल्या. जयदेव शहा १० धावा काढून बाद झाला. संघातील प्रमुख फलंदाज चेतेश्वर पुजाराने ८९ चेंडूंत ९ चौकार आणि १ षटकार खेचत ८६ धावा केल्या. वासवदाने ८७ चेंडूंत ९६ धावा ठोकल्या. चेतेश्वर आणि जॅक्सनने दुस-या विकेटसाठी ११० धावांची तर वासवदा आणि चिराग जानीने तिस-या गड्यासाठी १८४ धावांची भागीदारी करून संघाच्या डावाला आकार दिला. जानीने ३३ आणि रावलने १२ धावा जोडल्या. महाराष्ट्राकडून मुथ्थास्वामीने ५६ धावांत २ बळी घेतले.
अंकितचे स्पर्धेतील दुसरे शतक
महाराष्ट्राकडून मधल्या फळीतील अंकित बावणेने सलग तीन सामन्यांत दमदार प्रदर्शन केले. दुस-या लढतीत नाबाद शतक, तिस-या लढतीत नाबाद ७८ धावा आणि चौथ्या लढतीत नाबाद ११० धावांची खेळी केली. मात्र, इतरांची साथ न मिळाल्याने सौराष्ट्राविरुद्ध तो संघाला िवजय मिळवून देऊ शकला नाही. हर्षद खडीवाले भोपळाही फोडू शकला नाही. विजय झोल १३, तर रोहित मोटवाणी १० धावांवर बाद झाला. निखिल परडकरने २३ आणि अनुपम संकलेचाने ३८
धावा करत संंघर्ष केेला.
संक्षिप्त धावफलक
सौराष्ट्र ५ बाद ३०३. वासवदा ९६, चेतेश्वर पुजारा ८६ धावा. मुथ्थास्वामी २/५६. महाराष्ट्र ८ बाद २४०. अंकित बावणे ११०*, अनुपम संकलेचा ३८ धावा. सिद्धांत त्रिवेदी ३/३०.