आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Maharashtra Made 272 Runs In Ranji Cup Final Match

रणजी करंडकच्‍या अंतिम सामन्यात महाराष्‍ट्राचे पहिल्या दिवस अखेर 5 बाद 272 धावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हैदराबाद - औरंगाबादचा तडफदार खेळाडू अंकित बावणे (नाबाद 89) आणि सलामीवीर चिराग खुराणाच्या (65) तडफदार खेळीच्या बळावर रणजी करंडकाच्या फायनलमध्ये महाराष्‍ट्राने पहिल्या दिवसअखेर 5 बाद 272 धावा काढल्या. कर्नाटकविरुद्ध महाराष्‍ट्र संघ संकटात असताना अंकित आणि चिरागच्या फलंदाजीने आधार दिला.
पहिल्या दिवसाचा खेळ संपला त्या वेळी अंकित बावणे 89 आणि संग्राम अतीतकर 29 धावांवर नाबाद होते. दोघांनी सहाव्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी केली. अंकितने 171 चेंडूंचा सामना करताना 10 चौकारांच्या मदतीने ही खेळी साकारली. संग्रामने 66 चेंडूंचा सामना करताना 5 चौकार मारले. गुरुवारी अंकित बावणेला रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये ऐतिहासिक शतक ठोकण्याची संधी असेल. महाराष्‍ट्राचा कर्णधार रोहित मोटवाणीने सकाळी टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. महाराष्‍ट्राचे सलामीवीर हर्षद खडीवाले आणि चिराग खुराणा यांनी 24 धावांची सलामी दिली. विनयकुमारने खडीवालेला पायचीत करून महाराष्‍ट्राला नवव्या षटकात पहिला हादरा दिला. तिस-या क्रमांकावर आलेला जालन्याचा गुणवंत युवा फलंदाज आणि भारताच्या 19 वर्षांखालील संघाचा कर्णधार विजय झोल मात्र या वेळी मोठी खेळी करू शकला नाही. अरविंदच्या एका बाहेर जाणा-या चेंडूवर त्याचा उडलेला झेल यष्टिरक्षक गौतमने टिपला. युवा खेळाडू विजय झोलने 28 चेंडूंचा सामना करताना 5 धावा काढल्या.
यानंतर चिराग आणि केदार जाधव यांनी तिस-या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. अभिमन्यू मिथुनने केदार जाधवचा अडथळा दूर करून मोठे यश मिळवले. महाराष्‍ट्राच्या 90 धावा झाल्या असताना केदार जाधवच्या रूपाने तिसरा गडी बाद झाला. केदारने 44 चेंडूंत 4 चौकारांसह 37 धावांचे योगदान दिले. यानंतर अंकित बावणे आणि चिराग यांनी महाराष्‍ट्राचा डाव सावरला.
मिथुनच्या 2 विकेट
चिराग 64 धावा काढून तंबूत परतला. त्याला नायरने पायचीत केले. सहाव्या क्रमांकावर आलेल्या रोहित मोटवाणीला संघ अडचणीत असताना मोठी खेळी करता आली नाही. रोहित 17 धावा काढून चालता झाला. मिथुनने त्याला बाद केले. कर्नाटककडून अभिमन्यू मिथुनने 44 धावांत 2 विकेट तर विनयकुमार, अरविंद आणि नायर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
तीन अर्धशतकी भागीदा-या
महाराष्‍ट्राची टीम संकटात सापडली असताना अंकित बावणेने तीन अर्धशतकी भागीदा-या करून डाव सावरला. सुरुवातीला त्याने चिराग खुराणासोबत चौथ्या विकेटसाठी 54 धावांची, कर्णधार रोहित मोटवाणीसोबत पाचव्या गड्यासाठी 71 धावांची आणि संग्राम अतीतकरसोबत नाबाद 57 धावांची भागीदारी केली. एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना दुस-या टोकाने अंकितने जबाबदारीने खेळी केली.
धावफलक
वेस्ट इंडीज धावा चेंडू 4 6
खडीवाले पायचीत गो. विनयकुमार 15 29 3 0
खुराणा पायचीत गो. नायर 64 145 8 0
झोल झे. गौतम गो. अरविंद 05 28 0 0
जाधव झे. गौतम गो. मिथुन 37 44 6 0
अंकित बावणे नाबाद 89 172 10 0
मोटवाणी झे. गौतम गो. मिथुन 17 61 2 0
संग्राम अतीतकर नाबाद 29 66 5 0
अवांतर : 16. एकूण : 90 षटकांत 5 बाद 272 धावा. गडी बाद होण्याचा क्रम : 1-24, 2-42, 3-90, 4-144, 5-215. गोलंदाजी : विनयकुमार 23-5-56-1, अभिमन्यू मिथुन 19-6-44-2, श्रीनाथ अरविंद 23-6-62-1, मनीष पांडे 1-0-2-0, श्रेयस गोपाल 13-0-54-0, करुण नायर 5-1-21-1, अमित वर्मा 4-0-14-0, गणेश सतीश 2-0-8-0.