आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापुणे - येथील सहारा स्टेडियमवर झालेल्या 19 वर्षांखालील खेळाडूंच्या कुचबिहार क्रिकेट करंडक स्पर्धेत महाराष्ट्राने विजेतेपद पटकावले. महाराष्ट्राच्या टीमने फायनलमध्ये मुंबईला पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर पराभूत केले. दुस-या डावात महाराष्ट्रा कडून विजय झोलने 181 तर शुभम रांजणेने 169 धावांची शतकी खेळी करून
मैदान गाजवले.
महाराष्ट्राने सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात 294 धावा काढल्या होत्या. प्रत्युत्तरात मुंबईला 238 धावांवर रोखून यजमान टीमने महत्त्वपूर्ण अशी 56 धावांची आघाडी घेतली. दुस-या डावात महाराष्ट्राने 546 धावांचा डोंगर उभा करताना मुंबईसमोर अशक्यप्राय असे 603 धावांचे विजयासाठी लक्ष्य दिले. महाराष्ट्रा कडून दुस-या डावात सलामीवीर विजय झोलने 247 चेंडूंचा सामना करताना 26 चौकार आणि 3 षटकारांसह 181 धावांची तुफानी खेळी केली. त्याचे द्विशतक थोडक्याने हुकले. विजयसोबत शुभम रांजणेने सुद्धा 169 धावांची खेळी केली. त्याने 232 चेंडूंत 7 षटकार आणि 21 चौकारांच्या मदतीने या धावा काढल्या. तळाचा फलंदाज एस. काझीनेही 66 धावा काढल्या.
मुंबईकडून अमित कदमने 147 धावांत 4 गडी बाद केले. दुस-या डावात सहाशेपेक्षा अधिक धावांचा पाठलाग करताना मुंबईने दिवसअखेर बिनबाद 46 धावा काढल्या. मात्र, तोपर्यंत त्यांचा पराभव निश्चित झाला होता. पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर महाराष्ट्राने विजेतेपद मिळवले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.