आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्लबअभावी महाराष्ट्रातील महिला फुटबॉलपटू वार्‍यावर!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - राज्य संघटनांच्या दुर्लक्षामुळे महाराष्ट्रामध्ये महिलांच्या फुटबॉल क्लबची संस्कृती काही केल्या रुजवली जात नाही. त्यामुळे सध्या क्लबच्या अभावामुळे राज्यातील महिला फुटबॉल धोक्यात सापडला आहे. राज्यातील या गैरसोयीमुळे महिला फुटबॉलपटू अडचणीत सापडल्या आहेत. इतर राज्यातील खेळाडूंच्या तुलनेत महाराष्ट्रातील सरस असलेल्या खेळाडूंवर करिअर अर्ध्यावर सोडण्याची परिस्थिती ओढवली आहे.

स्टार खेळाडूंचे करिअर अडचणीत : राज्यातील अनेक स्टार महिला खेळाडूंचे करिअर सध्या क्लब नसल्यामुळे अडचणीत सापडले आहे. या महिला खेळाडूंना विद्यापीठस्तरीय स्पर्धांपर्यंतच आपले करिअर चमकवण्याची संधी आहे. त्यानंतर खुल्या गटात खेळण्यासाठी कोणत्याही प्रकारचा क्लब अस्तित्वात नाही. त्यामुळे या महिला खेळाडूंना आपला छंद अध्र्यावर सोडून द्यावा लागत असल्याचे सध्या चित्र निर्माण झालेले आहे.

सहा स्पर्धांपुरतेच महिला खेळाडूंचे अस्तित्व : महाराष्ट्रातील महिला फुटबॉलपटूंचे अस्तित्व केवळ सहा स्पर्धांपुरतेच र्मयादित असल्याचे स्पष्ट होत आहे. राज्यात तीन वयोगटात महिलांच्या फुटबॉल स्पर्धांचे आयोजन केले जाते. यात 14, 17 आणि 19 वर्षांखालील स्पर्धांचा समावेश आहे. त्यापाठोपाठ राज्यात विद्यापीठस्तरीय फुटबॉल स्पर्धांचे आयोजन केले जाते. मात्र, त्यानंतर खुल्या गटात स्पर्धा आयोजित केल्या जात नाही. त्यामुळे विद्यापीठस्तरीय स्पर्धेनंतर महिला खेळाडूंचे करिअर संपुष्टात येते.

क्लब स्थापनेची गरज
राज्यातील महिला फुटबॉलपटूंची होणारी फरपट थांबवण्यासाठी आता राज्य संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे. त्यासाठी राज्यभरात महिलांच्या फुटबॉल क्लब स्थापनेला चालना मिळावी. याच क्लब संस्कृतीच्या माध्यमातून महिला खेळाडूंमधील कौशल्य टिकवून ठेवता येईल. शिवाजी पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते, कोल्हापूर

लीग स्पर्धांचा अभाव
राज्यात महिला फुटबॉलला चालना मिळवून देण्याबाबत राज्य संघटनांमध्ये निरुत्साहाचे वातावरण दिसून येते. त्यामुळे महिला स्पर्धांच्या आयोजनाबाबत अनुत्सुक आहेत. खुल्या वा लीग स्पर्धांच्या अभावामुळे महिला फुटबॉलपटूंना आपले कौशल्य दाखवता येत नाही. तसेच या महिला खेळाडूंना इतर स्पर्धेतही सहभाग घेता येत नाही.
राज्य संघटनेला स्पर्धांचा विसर!
राज्य फुटबॉल संघटनेला सध्या महिलांच्या सीनियर राज्य फुटबॉल स्पर्धा आयोजनाचा साफ विसर पडला आहे. त्यामुळेच मागील पाच वर्षांपासून या स्पर्धांचे कोणत्याही प्रकारे आयोजन करण्यात आले नाही. या स्पर्धांकडे संघटनेनेच पाठ फिरवल्यामुळे सीनियर महिला खेळाडूंचे करिअरच धोक्यात सापडल्याचे चित्र आहे.

(फोटो - संग्रहित छायाचित्र)