आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahela Jayawardene Quit T 20 Latest News In Marathi

संगकारानंतर जयवर्धनेचाही टी-20 ला अलविदा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ढाका - श्रीलंकन क्रिकेटचा आधारस्तंभ, लढवय्या तंत्रशुद्ध फलंदाज माहेला जयवर्धनेनेही विश्वचषकानंतर टी-20 क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर त्याने ही घोषणा केली आहे. आयसीसीने खेळाडूंना थेट चाहत्यांना बोलता यावे म्हणून ही खास ट्विटर सेवा सुरू केली आहे. त्यामार्फत जयवर्धनेने आपण निरोप घेतोय, असे सांगितले आहे. विश्वचषक स्पर्धा सध्या बांगलादेशात सुरू आहे.
विशेष म्हणजे, श्रीलंकेचा आणखी एक आधारस्तंभ कुमार संगकारानेही विश्वचषकानंतर टी-20 क्रिकेटला रामराम ठोकणार असल्याची घोषणा काही तासांपूर्वीच केली होती. हे दोघेही लंकेचे समकालीन फलंदाज आहेत. दोघांनीही अनेकदा संघाला संकटातून तारले. मोठय़ा भागीदार्‍या रचून विरोधी संघांना पाणी पाजले. संगा-जयवर्धनेचे एकत्र छायाचित्र या ट्विटर साइटवर झळकले आहे.
36 वर्षीय जयवर्धनेची ही चौथी टी-20 विश्वचषक स्पर्धा आहे. सर्वकालीन सर्वोत्तम फलंदाज अशी त्याची ख्याती राहिली. 49 टी-20 सामन्यांतून त्याने 1335 धावा जमवल्या त्या 31.78 च्या सरासरीने आणि 134.17 च्या स्ट्राइक रेटने. श्रीलंकेकडून टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा काढणारा तो फलंदाज आहे. त्याशिवाय न्यूझीलंडच्या ब्रँडम मॅक्युलमनंतर (64 सामने, 1959 धावा) टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा जयवर्धनेच्या नावावर आहेत. गेल्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत वेस्ट इंडीजविरुद्ध लंकेचा पराभव झाला. त्या संघाचा तो कर्णधार होता. टी-20 सामन्यात शतक ठोकणार्‍या मोजक्या फलंदाजांपैकी जयवर्धने एक आहे. या प्रकारांतील सर्वोच्च धावसंख्या त्याच्याच नावावर आहे. ही कामगिरी त्याने झिम्बॉब्वेविरुद्ध केली होती. 8 अर्धशतके जयवर्धनेने झळकावली. आयपीएलमध्येही त्याने चमक दाखवली. दिल्ली डेअरडेव्हिल्डकडून तो खेळायचा. मात्र यावर्षी जयवर्धनेला कोणीच खरेदी केले नाही.