आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

BLOG: कॅप्टन कूल महेंद्रसिंग धोनीची मजबूरी अन् त्याला सुचलेलं शहाणपण!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी - Divya Marathi
भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी
कॅप्टन कूल म्हणून प्रसिद्ध असलेल्या महेंद्रसिंह धोनीने अखेर एकदिवसीय आणि टी-20 क्रिकेटमधील कर्णधारपद सोडले. दोन वर्षापूर्वी म्हणजे जानेवारी 2015 तो शेवटची कसोटी सामना खेळला होता. तेव्हाही आताच्या प्रमाणे अचानकपणे कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा करून धोनीने क्रिकेट जगताला आश्चर्याचा धक्का दिला होता. आताही धोनीने आपल्या चाहत्यांना असाच धक्का दिला आहे. पण कॅप्टन कूल धोनीची ही मजबूरी आहे की वास्तवतेचे भान असा प्रश्न पडला आहे. खरं तर ही धोनीची मजबूरीच आहे पण त्याला सुचलेलं शहाणपण हे वास्तवतेच भान असल्याचे धोनी सिद्ध करतो.
 
दोन वर्षापूर्वी जेव्हा धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला होता तेव्हाही त्याची मजबूरीच होती. कारण 2014 साली धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने इंग्लंड दौ-याच आणि ऑस्ट्रेलिया दौ-यात कसोटी मालिकेत दोन्ही देशांविरूद्ध ०-४ असा दारूण पराभव स्वीकारावा लागला होता. त्याचवेळी धोनीची फलंदाजीतील कामगिरी तर कमालीची घसरली होती. कर्णधार म्हणूनही त्याचा या दौ-याच ठसा उमटला नव्हता. दुसरीकडे, विराट कोहलीने मेलबर्नमध्ये प्रतिकूल परिस्थितीत 169 धावांची खेळी करून तमाम भारतीय क्रिकेट चाहत्याचे आणि टीम व्यवस्थापनाचे लक्ष वेधून घेतले होते. तेव्हाचे टीमचे संचालक असलेले रवी शास्त्री तर विराटच्या कामगिरीवर आणि आक्रमतेवर फिदाच होते. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियात दौ-यात खराब कामगिरी होताच संघातील खेळाडू धोनीकडे बोट दाखवू लागले. धोनीला एकूणच खेळाडू, व्यवस्थापनाचा सूर समजू लागला  व त्याने आपल्या कामगिरीची मिमांसा करत मेलबर्नमध्ये डावाने पराभव होताच कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला.
 
धोनीचे कसोटीमधून निवृत्त होण्याची बीजं खरं तर 2011- 2012 या वर्षातच रोवली गेली होती. २०११ चा भारतात झालेला वर्ल्ड कप धोनीच्या नेतृत्त्वाखाली जिंकल्यानंतर तमाम देशवासियांनी व चाहत्यांनी त्याला डोक्यावर घेतले. कदाचित हे यशच त्याच्या डोक्यात गेल्याची चर्चा सुरु झाली. संघबांधणीच्या नावाखाली धोनीने दिग्गजांना धक्के द्यायला सुरुवात केली. याची सुरुवात त्याने वीरेंद्र सेहवागपासून केली. खरं तर सेहवागची कामगिरी खालावू नक्कीच लागली होती पण तो एक दिग्गज फलंदाज होता आणि त्याने सेहवागला सन्मानपूर्वक हाताळलं असतं जसं त्याने सचिन तेंडूलकरला हाताळलं तसं. पण धोनीने चालू मालिकेतूनच सेहवागला वगळले. सेहवागचा पत्ता कट केल्यानंतर धोनीने भारताचे अव्वल दर्जाचे फलंदाज राहिलेले राहुल द्रविड, व्ही. व्ही. एस लक्ष्मण यांच्याकडे मोर्चा वळविला. 
 
धोनीच्या सुदैवाने 2012 सालच्या ऑस्ट्रेलियात दौ-यात द्रविडसह लक्ष्मणची कामगिरी खाली आली होती. त्याआधी इंग्लंड दौ-यात राहुल द्रविडने भक्कम कामगिरी केली होती. मात्र, एका ऑस्ट्रेलिया दौ-यातील खराब कामगिरीनंतर धोनीने द्रविडसोबत लक्ष्मणला दुखावले. द्रविड तर इतका दुखावला गेला की, त्याने लागलीच आपण आता पूर्वीसारखी कामगिरी करू शकत नसल्याचे निवृत्ती जाहीर केली. धोनीवर राहुल द्रविडची आजही खपामर्जी असल्याची वंदता आहे.  
 
चर्चा तर ही ही झाली की, मागील वर्षी अनुराग ठाकूर व बीसीसीआयचे पदाधिकारी हे राहुल द्रविडकडे प्रशिक्षकपद सोपवू पाहत होते. मात्र, धोनी संघाचा कर्णधार असल्यानेच द्रविडने नकार दिल्याचे बोलले गेले. मी नुकताच क्रिकेटपासून दूर झालो आहे. आता मुलांकडे आणि कुटुंबाकडे काही काळ वेळ घालविण्याची गरज असल्याचे सांगत त्याने वेळ मारून नेली. मात्र त्याचवेळी द्रविडने भारत 'अ' संघाचे व 19 वर्षाखालील युवा क्रिकेटर्सना ट्रेनिंग देण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे वंदता पसरली की द्रविडला धोनीसोबत काम करायचे नव्हते. अखेर कुंबळे राजी झाले. कुंबळेनंतर नक्कीच द्रविड भारतीय संघाची जबाबदारी स्वीकारेल असा कयास आहे. 
 
धोनीने याच दरम्यान गौतम गंभीर, युवराज सिंग यांनाही दूर केले. अश्विनला पुढे करत त्याने हरभजनला बाहेरचा रस्ता दाखवला. अव्वल वेगवान गोलंदाज झहीर खान दुखापतीने त्रस्त होता पण धोनीने त्याला झळल्याची चर्चा झाली. याच काळात धोनीने दुय्यम दर्जाच्या वेगवान गोलंदाजांना संधी दिली होती. ते खेळाडू आता आयपीएल सोडा पण रणजी स्पर्धेतही पुरेशी कामगिरी करू शकले नाहीत.
 
काळ पुढे सरकत होता. विराट नावाचा जागतिक दर्जाचा युवा खेळाडू याच दरम्यान भारताला गवसला. याच काळात भारत, क्रिकेट आणि विराट असे समीकरणच बनले. विराट चाहत्याच्या गळ्यातील ताईत बनला. आपल्या अचाट कामगिरीने त्याने क्रिकेटमधील दिग्गजांना घायाळ केले. सुनील गावसकर, विवियन रिचर्डस यांच्यापासून आताच्या सचिन, पाँटिंग या समकालीन क्रिकेटपटूंनी विराटच्या कामगिरीचे आणि तंत्राचे कौतूक केले. यासोबत त्याच्या धावांची भूक, टीम स्पिरीट, जिंकण्याची जिद्द व कोणत्याही परिस्थितीत हार न मानण्याची त्याची निडर वृत्ती यामुळे तो सर्वांच्या कौतूकास पात्र ठरत होता. टीममध्ये फूट पडली होती. धोनीच्या कॅम्पमध्ये सुरैश रैना, विजय, शिखर धवन असल्याचे बोलले गेले. अश्निन, जडेजा धोनीला मानणारे होते पण त्यांच्यातही बिनसले आणि ही जोडी विराट कॅम्पात दाखल झाली. रोहित, केएल राहुल, युवराज, हरभजन, अश्विन, जडेजा, अजिंक्य रहाणे आदी विराट कॅम्पात होते. ही बाब धोनीच्या लक्षात आली नसती तरच नवल.
 
दुसरीकडे धोनीची जादू संपायला सुरुवात झाली होती. संघाची कामगिरी खराब झाली की काही खेळाडू धोनीकडे बोट दाखवत व त्याने घेतलेल्या काही चुकीच्या निर्णयामुळेच संघ हारल्याची कुजबूज करत. या गोष्टी धोनीच्या कानावर जातच होत्या. यातूनच धोनी राजकारण करू लागल्याची चर्चा होती. भारतात गेल्या वर्षी झालेल्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताला न्यूझीलंडविरूद्ध अनपेक्षित आणि दारूण पराभव स्वीकारावा लागला. या सामन्यात धोनीने अव्वल गोलंदाज अश्विनला सोडून नवख्या फिरकी गोलंदाजाकडे चेंडू दिला. अश्निनला 12 व्या षटकानंतर गोलंदाजी दिली. तोपर्यंत किवी फलंदाज सेट झाले होते व त्यांनी नंतर अश्विनसह सर्वच गोलंदाजांच्या चिंधड्या उडवत मोठी धावसंख्या उभारली. विजेतेपदाचा फेवरेट मानलेला भारतीय संघ मायदेशातील टी-20 वर्ल्डकपमधून बाहेर पडला. रहाणेलाही एकदा पू्र्वसूचना न देताच बाहेरचा रस्ता दाखवला. याचवेळी धोनीची फलंदाजीतील कामगिरी साजेशी होत नव्हती. कर्णधारपद सांभाळत असला तरी तो प्रतिस्पर्धी संघाविरूद्ध वर्चस्व राखू शकत नव्हता. 
 
बेस्ट फिनिशर मिळवलेली उपाधीही त्याला दगा देऊ लागली. गेल्या वर्षी फ्लोरिडा येथे वेस्ट इंडिजविरूद्ध झालेल्या टी-20 सामन्यात दोनशेच्या घरात धावांचा यशस्वी पाठलाग करत आघाडीच्या फलंदाजांनी भारताचा विजय आवाक्यात आणला होता. शेवटच्या षटकात 10 पेक्षा कमी धावा करायच्या होत्या तर धोनी स्ट्राईकवर होता पण धोनीला त्या करताा आल्या नाहीत परिणामी ती मालिका भारताने गमावली. धोनीच्या नेतृत्त्वाखालील वन डे व टी-20 संघाची कामगिरी सामान्य होती तर विराटच्या नेतृत्त्वाखालील कसोटीतील भारत संघ पुन्हा अव्वल बनला. न्यूझीलंडविरूद्धची कसोटी मालिका भारताने आरामात खिशात घातली तर त्याच संघाने वनडे मालिकेत भारताला रडवले. धोनीच्या नेतृत्त्वात भारताने 3-2 ती मालिका जिंकली खरी पण ते निर्भेळ यश नव्हते. 
 
नुकत्याच इंग्लंडविरूद्ध पार पडलेल्या 5 कसोटी सामन्याच्या मालिकेतही विराट सेनेने 4-0 अशी जबरदस्त कामगिरी केली. इंग्लंड संघ दर्जेदार आहे पण विराटच्या रणनितीपुढे सपशेल गार झाले. आता काही दिवसात वन डे आणि टी-20 मालिकेत निर्भेळ यश मिळविण्याचा धोनीवर दबाव होता. दुसरीकडे, संघातील खेळाडू आता कॅप्टन कूल धोनीऐवजी विराटचे गुणगाण करत होते. मागील आठवड्यात सौरव गांगुलीने धोनीवर कर्णधारपदाचा व एकूनच कामगिरीचा नक्कीच मोठा दवाब राहील असे सांगत धोनीने बाजूला होण्याची व विराटकडे नेतृत्त्व देण्याची वेळ आली असल्याचे संकेत दिले होते. 
 
धोनीला आपली वेळ संपल्याचे लक्षात आले होते. त्याच्यापुढे पुन्हा 2012 साली सेहवाग, द्रविड आणि लक्ष्मणसोबत काय घडले, घडवले आणि त्यावेळी आपणाला काय हवे हे त्याला आता उमगले असेल. दुसरीकडे, 2014 साली कसोटीतून अचानक निवृत्ती घेतल्याचेही क्षण त्याला आठवले असतील. धोनीने जे पेरले तेच उगवले. भारतीय क्रिकेटच्या भल्यासाठी धोनीने बाजूला जाण्याची गरजच होती नव्हे तर त्याची मजबूरी होती, सोबतच त्याला या वास्तवतेचे भान राहिले, होते म्हणूनच तो आता सन्मानाने कर्णधारपदातून मुक्त झाला असे म्हणता येईल. 
बातम्या आणखी आहेत...