आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महेश गवळीचे काही चुकले?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशसेवा की क्लब-करिअर? आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटू महेश गवळीला गेली दोन-तीन वर्षे ही जटिल समस्या सतावत होती. त्यावर मार्ग काढताना झाली तेवढी देशसेवा पुरे झाली, आता आपले भविष्य सुरक्षित करण्याला प्राधान्य देणे योग्य, असे त्याला योग्य किंवा व्यवहार्य वाटले. आपल्या देशामध्ये फुटबॉलमध्ये म्हणावा तेवढा पैसा नाही. राष्ट्रीय संघामध्ये तुम्ही असाल म्हणून अर्थार्जन होईल असे म्हणाल, तर तशी स्थिती बिलकूल नाही. देशासाठी खेळावयाचे ते निव्वळ राष्ट्राची प्रतिष्ठा जपण्यासाठी, ती उंचावण्यासाठी, राष्ट्राच्या प्रती आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी, थोडक्यात राष्ट्र किंवा देशसेवा त्यामुळे ठरावीक मर्यादेपलीकडे लाभदायी नाही असाच त्याचा अर्थ. म्हणूनच महेशने 14 वर्षांच्या प्रामाणिक देशसेवेनंतर आणि शरीर हवी तेवढी साथ देण्यास थोडी कुरकुर करू लागल्यानंतर उर्वरित करिअरमधील दोन-चार वर्षांमध्ये आपले भविष्य सुरक्षित करण्याचा जो निर्णय घेतला तो योग्य अथवा उचितच म्हणायला हवा. यापूर्वीही हॉकी-फुटबॉलसारख्या खेळामध्ये कैक खेळाडूंनी आपल्या नोकरीमध्ये बढती मिळवण्यासाठी, आयुष्यात होऊ शकणाºया प्रगतीचा, तसेच भविष्याचा विचार करून आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला पूर्णविराम दिल्याचे आपण पाहिले. त्यात आॅलिम्पिक हॉकीपटू आणि विश्वचषक विजेते अशोककुमार यांचे उदाहरण झटकन लक्ष वेधून घेते. आपल्या राष्ट्रीय विमान कंपनीमध्ये तेव्हा कार्यरत असणाºया या महान खेळाडूला हॉकीच्या ‘नॅशनल ड्यूटी’वर असता आपल्या नोकरीत मिळणाºया भत्त्यांना मुकावे लागत असे. काही वर्षे त्यांनी हे नुकसान सोसले खरे, पण शेवटी नाइलाजास्तव देशसेवा पुरे, असा कटू निर्णय घेण्यावाचून त्यांच्यापाशी पर्याय राहिला नाही.
आज जर आमचा फुटबॉल किंवा हॉकीपटू देश की क्लब या समस्येपोटी क्लब पसंत करत असेल तर तेही केवळ पाच-पन्नास लाख किंवा जेमतेम कोटी-दोन कोटी रुपयांसाठी. कसोटी क्रिकेटमध्ये लाखो रुपये, बेनिफिट मॅच, बेनेव्होलंट फंड, पेन्शन, एक-दिवसीय आणि टी-20 चे बेसुमार उत्पन्न असे फायदे पदरी पडूनही क्लब क्रिकेटला उघडपणे नसले तरी त्या क्रिकेटला मनोमन प्राधान्य देणाºया खेळाडूंशी त्याची तसूभारही तुलना होऊ शकत नाही. त्याला देशासाठी खेळून काडीचेही उत्पन्न मिळत नाही, हे विदारक सत्य बºयाच ‘क्रीडाप्रेमीं’ना ठाऊक नसावे. म्हणूनच महेशने जे केले ते योग्य आणि तेही पूर्ण विचाराअंतीच. तसे केल्याने त्याला देशाविषयी प्रेम नाही असा अर्थ त्या कृतीतून निघत नाही. तो स्वार्थी आहे असेही नाही. आज शरीर साथ देते आहे तोपर्यंत खेळायचे. आपले नाणे चालते आहे तोपर्यंत ते चालवायचे, हा निर्णय निश्चित शहाणपणाचाच!
तसे पाहावयास गेले तर महेशने 14 वर्षे इमानेइतबारे देशसेवा केली. त्या कालावधीमध्ये भारताचा हा भक्कम बचावपटू 82 सामने खेळला. टाटा फुटबॉल अकादमीची पदविका प्राप्त महेशने आपला बॅचमेट दीपक मोंडलसह देशाला कैक विजय मिळवून दिले. आपल्या या प्रदीर्घ कारकीर्दीदरम्यान तो एक समर्पित आणि प्रामाणिक खेळाडू म्हणून ओळखला गेला.
विश्व आणि आशियाई फुटबॉलमध्ये वरचे स्थान प्राप्त नसलेल्या भारताने आपल्या कुवतीनुसार ज्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या- सॅफ कप 2005 आणि 2011, नेहरू कप 2007, 2009, एएफसी चॅलेंज कप 2008 आणि एलजी कप- तेव्हा महेशने देशाचे प्रतिनिधित्व केले. याशिवाय राष्ट्रीय स्तरावर इस्ट बंगालकडून 2003-05 मध्ये खेळताना त्याने राष्ट्रीय साखळी जिंकून देण्यात मोठी भूमिका बजावली. मुंबईच्या महिंद्रशी 2005-06 या वर्षी करारबद्ध असता महेशने त्यांना प्रतिष्ठेची आयएफए ढाल स्पर्धा, फेडरेशन चषक जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. गोव्यात चर्चिल ब्रदर्सला तेथील व्यावसायिक साखळी तीन वेळा जिंकून देताना महेश त्यांचा प्रमुख आधारस्तंभ होता. शेवटी 2007 नंतर आपल्या गोमंतकच्या मातीशी दृढ नाते असणारा महेश तेथील डेम्पो स्पोर्ट््सशी करारबद्ध झाला. त्याच वर्षी भारताच्या निमव्यावसायिक साखळीचे पूर्ण व्यावसायिक असे रूपांतर झाले. तसेच ‘आय-लीग’ असे नामकरणही झाले. ती स्पर्धा जिंकण्याचा चंग बांधलेल्या डेम्पोने ती 2007-08 आणि 2009-10 या हंगामामध्ये जिंकली. अशा तºहेने आपली कारकीर्द गाजवणाºया महेशला महासंघाने दोनदा शिफारस केल्यानंतरही अर्जुन पुरस्कारासाठी योग्य मानले गेले नाही. तरीही त्यानंतर तो दोन वर्षे देशासाठी खेळला.
त्याच्या पात्रतेविषयी, मोठेपणाविषयी सांगायचे तर भारताचे इंग्लिश प्रशिक्षक बॉब हाऊटन त्याच्याबद्दल काय म्हणाले होते हे पाहिले तर नेमकी कल्पना तुम्हाला यावी. नेहरू चषक स्पर्धेमध्ये ऐन अडचणीच्या वेळी लेफ्ट बॅक स्थानावर तो खेळला होता. एरवी सेंट्रल डिफेंडर म्हणून खेळणारा महेश करिअरच्या सुरुवातीपासून राइट-बॅक म्हणून खेळला असता तर तो आशियामधला त्या स्थानावरचा सर्वोत्तम खेळाडू बनला असता, अशी प्रशंसा हाऊटननी दोन वर्षांपूर्वी केली होती. भारताने ती स्पर्धा जिंकली होती.
अर्जुन पुरस्कारांकडे पुन्हा एकदा वळून पाहताना असे दिसते की, 2003 ते 2009 अशी सात वर्षे तो कोणालाही देण्यात आला नव्हता. महेश गवळी या पुरस्कारासाठी निश्चित योग्य होता, असे त्याला दशकभराहून जास्त कालावधीदरम्यान खेळताना पाहिल्यानंतर म्हणावेसे वाटते.