आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mahindrasingh Dhoni News In Marathi, Divya Marathi, England

धोनीची गच्छंती अटळ, कवडीमोल दर्जाची कामगिरीचा परिणाम

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - जागतिक क्रिकेटमध्ये करोडो रुपये किंमत व सर्वाधिक खेळाडूंचा भरणा असलेला संघ टीम इंडियाचा आहे. इंग्लंड दौ-यात या करोडपतींनी केलेला खेळ मात्र कवडीमोल दर्जाचा आहे. या संघाचा नेता महेंद्रसिंग धोनीदेखील गच्छंतीच्या किना-यावर उभा आहे. कल्पनाशून्य नेतृत्व हा त्याच्यातला नवा गुणधर्म आहे. संघातील खेळाडूंना प्रेरणा देणारी प्रेरकशक्तीची त्याची ‘कुपी’देखील रिक्त झाली आहे. नुकताच इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत भारतीय संघाला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळेच टीम इंडियावर टीका केली जात आहे.

टी-20 विश्वचषक आणि 50 षटकांचा विश्वचषक जिंकून देणा-या धोनीपुढची महत्त्वाकांक्षाच संपली आहे. कल्पनांची तिजोरी रिकामी झाली आहे. सतत खेळून शारीरिक थकवा आला आहेच, सोबत प्रचंड मानसिक थकवाही आला आहे. मरगळलेल्या इंग्लंड संघाला आपण नवसंजीवनी दिली. कूकपासून, अ‍ॅन्डरसन, ब्रॉड या खेळाडूंना गेलेला आत्मविश्वास आपण परत मिळवून दिला आहे. याला जबाबदार कोण? या एकमेव प्रश्नाची उत्तरे अनेक आहेत.

भारतीय क्रिकेटचा पुरता बट्ट्याबोळ
चेन्नई सुपरकिंग्जचाच कप्तान भारताचा कर्णधारही असावा हा एन. श्रीनिवासन यांचा राजहट्ट पुरवण्यापायी आपण भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा पुरता बट्ट्याबोळ केला आहे. शशांक मनोहर या विदर्भ क्रिकेटच्या प्रमुखांनी श्रीनिवासन यांना विरोध केल्यामुळे भारताचा आजच्या घडीचा सर्वोत्तम वेगवान गोलंदाज उमेश यादव याला धोनीने संघात येण्यास आडकाठी निर्माण केली. सेहवाग व गौतम गंभीर या कप्तानपदाच्या स्पर्धेतील संभाव्य खेळाडूंना राजकारण खेळून व्यवस्थित बाहेर काढले. त्यामुळे 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध 4-0 आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4-0 असा सपाटून मार खाल्ल्यानंतरही धोनीला कप्तानपदावरून दूर करण्यात आले नाही.

धोनीची दुबळी बाजू जगजाहीर
धोनीला यशस्वी करण्यासाठी अलीकडच्या काळात वेस्ट इंडीजसारख्या दुबळ्या संघांविरुद्धच्या मालिका आयोजित करण्यात आल्या. त्यामुळे इंग्लंड दौ-यावर धोनीच कप्तान म्हणून गेला. इंग्लंड दौ-यात धोनीच्या अनेक उणिवा उघड्या पडल्या. धोनी स्वत: उत्तम यष्टिरक्षक कधीच नव्हता. मात्र, नेतृत्वामुळे व तडाखेबाजामुळे त्याच्या त्या उणिवेकडे कानाडोळा करण्यात आला होता. या इंग्लंड दौ-यात थकलेल्या धोनीची ती बाजू अधिक प्रकाशात आली. काही वेळा झेल टिपण्यासाठीही त्याने प्रयत्न केले नाहीत.

‘मोटिव्हेशन’ संपल्याचे मिळाले संकेत
धोनीसाठी आता करायचे काहीही शिल्लक राहिलेले नाही. त्यामुळे त्याच्यापुढे काहीच लक्ष्य नाही. इंग्लंड दौ-यात त्याने अनेकदा सरावाला मारलेली दांडी किंवा सामना दोन दिवस लवकर संपल्यामुळे अधिक विश्रांती मिळेल असे त्याचे वक्तव्य त्याच्यातले ‘मोटिव्हेशन’ संपल्याचे दर्शवत आहे. स्वत:साठीही नाही तर संघांसाठी व अन्य तरुण खेळाडूंनाही प्रेरणास्रोत असलेली त्याची इच्छाशक्तीही संपल्यागत वाटते. नवोदित गोलंदाजांना तो मार्गदर्शनही करीत नव्हता. कर्णधार म्हणून व्यूहरचना आखताना व डावपेच लढवताना त्याने चुका केल्या. गोलंदाज ऑफ स्टम्पवर आक्रमण करत त्याने 4-4 क्षेत्ररक्षक लावले.

नेतृत्व गमावलेला कर्णधार
इंग्लंडच्या तळाच्या खेळाडूंनी प्रत्येक वेळी प्रमुख फलंदाजांनी काढलेल्या धावांपेक्षा अधिक धावा काढल्या. अखेरच्या जोडीने तर 198 धावांच्या भागीदारीचा विश्वविक्रम केला. एवढा प्रचंड अनुभव गाठीशी असलेला धोनी कल्पना, डावपेच आणि नेतृत्वगुणच गमावलेला कप्तान वाटला. त्याच्याकडे या वेळी इंग्लंड संघासाठी योजना ‘ए’ नव्हती ती योजना अपयशी ठरली तर ‘बी’ योजनाही नव्हती. जे काही आपोआप घडत जाईल त्याप्रमाणे त्याने घडू दिले. त्या प्रवाहाबरोबर तो चालत राहिला.

श्रीनिवासननी केला धोनीचा गेम!
श्रीनिवासन हे जसे स्वत: बीसीसीआयच्या अध्यक्षपदाला चिकटून राहिले होते तसेच त्यांनी धोनीलाही चेन्नई सुपरकिंग्जच्या स्पर्धांसाठी भारतीय संघाच्या कप्तानपदाला चिकटवून ठेवले. खरं तर कसोटी, 50 षटकांचे क्रिकेट व 20 षटकांचे क्रिकेट या तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये धोनीऐवजी अन्य नेता निवडणे गरजेचे होते. परंतु श्रीनिवासन यांची भारतीय क्रिकेटमधील हुकूमत एवढी जबरदस्त आहे की त्यांच्याविरुद्ध आणि धोनीविरुद्ध बोलण्यास आता कुणीही धजावत नाही. त्याचाच अतिरेक आपण आता पाहत आहोत. धोनीने सीनियर्सना बाहेरचा रस्ता दाखवला. आता भारतीय संघाचे नेतृत्व द्यायचे कुणाला हा प्रश्न आहे. त्याचा उत्तराधिकारी आपण मानतो तो विराट कोहलीही सपशेल अपयशी ठरला आहे. मात्र, सध्यातरी त्याच्याशिवाय आपल्याकडे पर्याय दिसत नाही.

वेट अँड वॉच
तुम्ही केवळ वेट अँड वॉच करा. काही दिवसांत मी नेतृत्वाबाबतचा प्रभावशाली निर्णय घेणार आहे. त्यासाठी मनाची तयारी करत आहे. आमच्या युवा खेळाडूंनी मालिकेत शेवटपर्यंत चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला.
- महेंद्रसिंग धोनी, कर्णधार, भारतीय संघ