आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Malesiyan Grapri Gold Badminton News In Marathi, Saurbh, Divya Marathi

मलेशियन ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन: सौरभला उपविजेतेपद; सांतोसोने पटकावली ट्रॉफी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जोहार बाहरू - जागतिक क्रमवारीत 30 व्या स्थानी असलेल्या सौरभ वर्माने रविवारी मलेशियन ग्रांप्री गोल्ड बॅडमिंटन स्पर्धेचे उपविजेतेपद पटकावले. त्याची सिमोन सांतोसोविरुद्ध अंतिम सामन्यात 69 मिनिटे दिलेली झुंज अपयशी ठरली. यातून सौरभला पराभवाला सामोरे जावे लागले. इंडोनेशियाच्या सांतोसोने 15-21, 21-16, 21-19 अशा फरकाने अंतिम सामना जिंकला.


टाटा ओपन, ऑस्ट्रियन इंटरनॅशनलचा चॅम्पियन सौरभ वर्माने दमदार सुरुवात करताना पहिला गेम आपल्या नावे केला. यासह त्याने लढतीत आघाडी मिळवली. मात्र, त्याला ही आघाडी फार काळ टिकवून ठेवता आली नाही. इंडोनेशियाच्या खेळाडूने दमदार पुनरागमन करताना दुसरा गेम जिंकून लढतीत बरोबरी मिळवली. त्यानंतर तिसर्‍या निर्णायक गेममध्ये दोन्ही खेळाडूंमध्ये अटीतटीचा सामना झाला. यात अवघ्या दोन गुणांच्या आघाडीने सांतोसोने तिसर्‍या गेममध्ये बाजी मारून किताबावर नाव कोरले.


झुई यावो महिला गटात चॅम्पियन
महिला एकेरीत चीनची झुई यावो चॅम्पियन ठरली. दुसर्‍या मानांकित यावोने इंडोनेशियाच्या आंद्रियांती फिर्दासारीला 21-18, 21-8 ने पराभूत केले. तसेच चीनच्या यू झिओहान आणि हुआंग योक्युओंगने महिला दुहेरीचे अजिंक्यपद पटकावले. या पाचव्या मानांकित जोडीने फायनलमध्ये चीनच्या डोग्नी ओयू-मेनिगिंग झिओंगवर 22-20, 12-21, 21-18 ने मात केली.


हुआंगला दुहेरीत मुकुट
चीनच्या हुआंग योक्युओंगने दुहेरी मुकुट पटकावला. तिने महिला दुहेरीपाठोपाठ मिर्श दुहेरीचे विजेतेपद जिंकले. तिने ली काईसोबत ही किमया साधली. या जोडीने इंडोनेशियाच्या प्रवीण जॉर्डन-डेबी सुसांतोवर 21-14, 21-13 ने मात केली.