आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mark Boucher & T. Taibu Retired From International Cricket

सरावावेळीच्या दुखापतीमुळे बाऊचरची अकस्मात निवृत्ती; तैबूनेही घेतला संन्यास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- सॉमरसेट विरुद्ध टाँटन येथील सराव सामन्यात यष्टीरक्षण करताना दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक मार्क बाऊचरला बेल्स लागून सोमवारी दुखापत झाली होती. त्या दुखापतीनंतर सोमवारी बाऊचरच्या डाव्या डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली होती. तीन तासांच्या शस्त्रक्रियेनंतर त्या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्याची शक्यता बाऊरचला कमी वाटल्यामुळे त्याने आपण यापुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकत नसल्याचे जाहीर केले आहे. दक्षिण आफ्रिकेचा कप्तान ग्रॅमी स्मिथ याने बाऊचरने दिलेले प्रसिद्धी पत्रक वाचून दाखवले. त्यानुसार बाऊचरने म्हटले आहे, अतिशय दु:खद आणि जड अंत:करणाने मला जाहीर करावे लागत आहे की, डोळ्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरे होण्याची शक्यता नसल्यामुळे मी यापुढे पुन्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही. कारकीर्दीतील अन्य दौºयांप्रमाणे या वेळच्या इंग्लंड दौºयाची मी तयारी केली होती. अशा पद्धतीने उद््भवलेल्या परिस्थितीत मला निवृत्तीची घोषणा करावी लागेल, असे मी अपेक्षितही केले नव्हते. माझ्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीला यशस्वी होण्यास ज्या सर्वांचे हातभार लागले त्या सर्वांचे मी आभार मानू इच्छितो.
दक्षिण आफ्रिकन क्रिकेट संघाच्या वतीने बोलताना स्मिथने सांगितले, ‘बाऊचर आणि मी एकत्रच क्रिकेट खेळलो. 14 वर्षांच्या कारकीर्दीत तो सच्च्या प्रोटियन योद्ध्यासारखा (वॉरियर्ससारखा) खेळला. कोणत्याही अपेक्षेशिवाय त्याने सारे काही दिले. तो संघासाठी शंभर टक्के योगदान देणारा खेळाडू होता. तो यशस्वी खेळाडूपेक्षाही अधिक काहीतरी देणारा खेळाडू होता. तो संघासाठी प्रेरक शक्ती होता. तो संघाची ऊर्जा होता. त्याचा मित्रपरिवारही मोठा होता. आम्हाला दु:खी करून तू अशा विचित्र पद्धतीने निवृत्त झालास. तुझ्यातील झुंजार वृत्तीने तू संघाला मोठे केलेस. दुखापतीतून लवकरात लवकर बरे होण्याची आम्ही प्रार्थना करतो.
धार्मिक कार्यासाठी तैबूचा क्रिकेटला अलविदा
हरारे- झिम्बाब्वेचा माजी कर्णधार तातेंदू तैबूने आगामी काळात धार्मिक कार्यासाठी स्वत:ला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने मंगळवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे झिम्बाब्वेच्या क्रिकेट वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 29 वर्षीय तैबूने पुढील काळात चर्चसाठी काम करण्याची स्पष्टोक्ती दिली. गेल्या 11 वर्षापासून तो क्रिकेटमध्ये सक्रिय होता.
तैबूने झिम्बाब्वेकडून 28 कसोटी व 150 एकदिवसीय सामने खेळले आहेत. 19 जुलै 2001 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यातून त्याने कसोटी करिअरला सुरुवात केली. 1 नोव्हेंबर 2011 मध्ये न्यूझीलंडविरुद्धची कसोटी ही त्याची शेवटची राहिली. 23 जून 2001मध्ये विंडीजविरुद्ध त्याने वन डे करिअरमधील पहिला सामना खेळला होता. त्यानंतर न्यूझीलंडसोबतचा शेवटचा वन डे सामना त्याने 25 आॅक्टोबर 2011 मध्ये खेळला.
2004 मध्ये त्याने संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली होती. सर्वात लहान कर्णधार म्हणून त्याची या वेळी निवड करण्यात आली होती. यष्टिरक्षकासह फलंदाजीमध्ये त्याने उत्कृष्ट कामगिरीचे प्रदर्शन केली. 2005 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात नाबाद 85 धावांची झंझावाती खेळी करत त्याने सामनावीरचा बहुमान पटकावला होता. या धडाकेबाज खेळीच्या बळावर झिम्बाब्वेने हा कसोटी सामना अनिर्णीत ठेवला होता.
‘निवृत्तीचा घेतलेला निर्णय हा माझ्यासाठी दुखद आहे. आगामी काळात मला देवासाठी अधिक वेळ द्यायचा आहे. माझे काम सर्वांना अवाक करून सोडणारे आहे,’ असे तो म्हणाला.