आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशाचे गुपित: सिमेंटची विकेट, ओल्या चेंडूने आक्रमक क्रिकेटपटू बनवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- विजय र्मचंट यांच्यापासून सुनील गावसकर यांच्यासारख्या महान, तंत्रशुद्ध फलंदाजांच्या मुंबईतून पुढे आलेला सचिन तेंडुलकर आक्रमक फलंदाज कसा झाला? या प्रश्नाचे उत्तर दस्तुरखुद्द सचिन तेंडुलकरनेच शुक्रवारी मुंबईत दिले. तो म्हणाला, मी सिमेंटच्या विकेटवर रबरी चेंडू ओला करून तो वेगात फेकणार्‍या गोलंदाजांसमोर खेळायचो. तो चेंडू बचावात्मक पद्धतीने खेळण्यापेक्षा आक्रमक पद्धतीने खेळणे मला योग्य वाटले. फटकेबाजीचा आवेश टिकायला लागला आणि मी त्यातूनच आक्रमक फटकेबाज फलंदाज बनलो, अशी कबुली सचिनने ‘ईएसपीएन क्रिकइन्फो’चा गतपिढीतील सवरेत्तम क्रिकेटपटूचा पुरस्कार स्वीकारताना दिली.

सचिन पुढे म्हणाला, मी कारकीर्दीत अधूनमधून जेव्हा संधी मिळेल, तेव्हा सराव करताना पारस म्हांब्रे किंवा अन्य गोलंदाजांना चेंडू ओला करून कमी अंतरावरून वेगात फेकायला सांगायचो व फलंदाजीचा सराव करायचो.
सचिनने कसोटी क्रिकेट हेच खरे क्रिकेट असल्याचा पुनरुच्चार केला. कारण या क्रिकेटमध्येच खेळाडूंचा कस खर्‍या अर्थाने लागतो. याच क्रिकेटमध्ये गोलंदाज तुम्हाला कधी ना कधी बाद करतोच. मात्र, खेळाडूवर या क्रिकेटची सक्ती करू नये. त्याला आवडेल त्या पद्धतीने (ट्वेंटी-20 किंवा एकदिवसीय) क्रिकेट खेळू द्यावे. कसोटी क्रिकेटमध्ये यशाची शिखरे सर करण्यासाठी गुणवत्ता लागते, खूप मेहनत करावी लागते. ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये केवळ 3 चेंडूंतही खेळाडू हीरो बनतो.

तरीही मला वाटते की, कसोटी क्रिकेट सध्या उत्कृष्ट खेळाडूंच्या हाती सोपवण्यात आले आहे. आता बहुतेक सर्वच कसोटी सामने निकाली ठरत आहेत. त्यामुळे प्रेक्षकांमध्येही कसोटी क्रिकेटची उत्सुकता कायम टिकून आहे, असे सचिनने सांगितले.

गोलंदाजीची शैली, फलंदाजीतील फटक्यांमध्ये अनेक बदल झाले. फील्ड प्लेसिंग आव्हानात्मक बनली. त्यामुळे तुम्हाला तुमच्या फटक्यांमध्ये बदल करणे क्रमप्राप्त झाले.


कसोटीचा विकास व्हावा
कसोटी क्रिकेट जिवंत ठेवायचे असेल, तर आयसीसीने अधिक सामने आयोजित करावे. त्यामुळेच याचे महत्त्व अबाधित राहील. कसोटी क्रिकेट तंत्रशुद्ध खेळ आणि मानसिक कणखरता याच्यावर आधारलेले आहे, असे सचिन म्हणाला.

खेळात झपाट्याने बदल
माझ्या कारकीर्दीच्या उत्तरार्धात खेळ झपाट्याने बदलला. यापूर्वी 225 पासून पुढची धावसंख्या विजयी धावसंख्या वाटायची. आता 300 पुढची धावसंख्याही सुरक्षित नाही. 24 वर्षांच्या कारकीर्दीत क्रिकेटची अनेक स्थित्यंतरे पाहिली, असे तो म्हणाला.