औरंगाबाद - पदार्पणातील आशियाई स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी जिद्द, आत्मविश्वास आणि प्रचंड मेहनतीने केलेली तपश्चर्या फळाला आली. गत १२ वर्षांपासून केलेल्या कष्टातून मला ही स्वप्नपूर्ती करता आली, अशी प्रतिक्रिया सोलापूरची युवा टेनिसपटू प्रार्थना ठोंबरेने व्यक्त केली.
पहिल्यांदा सहभागी होत मिळवलेल्या पदकाने आत्मविश्वास द्विगुणित झाला, असेही प्रार्थनाने दैनिक ‘दिव्य मराठी’शी दूरध्वनीवरून बोलताना सांगितले. बार्शीच्या या युवा खेळाडूने नुकतेच
सानिया मिर्झासोबत आशियाई स्पर्धेच्या टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीत कांस्यपदक पटकावले.
बँकॉकला जिंकेल चषक
येत्या आठवड्यापासून बँकॉक येथे २५ हजार डॉलरच्या महिला टेनिस स्पर्धेला प्रारंभ होत आहे. या स्पर्धेसाठी प्रार्थना रविवारी बँकॉक येथे रवाना झाली. या स्पर्धेत दक्षिण कोरियात मिळवलेल्या पदकाची लय कायम ठेवण्याचा तिने निर्धार केला. यासाठी
आपण दर्जेदार कामगिरीत सातत्य टिकवून ठेवणार असल्याचेही प्रार्थनाने सांगितले. तिने आशियाई स्पर्धेतील कामगिरीला पुन्हा उजाळा देणार असल्याचे या वेळी नमूद केले.
पदार्पणात यश
प्रार्थना ठोंबरेने पदार्पणाच्या आशियाई स्पर्धेत आपल्या नावे पदकाची नोंद केली. तिने सानिया मिर्झासोबत महिला दुहेरीत कांस्यपदकावर नाव कोरले. तिला प्रथमच आशियाई स्पर्धेत भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली होती. याच संधीचे सोने करताना तिने भारताला पदक मिळवून दिले, या कामगिरीने माझा आत्मविश्वास दुणावला, असेही प्रार्थना म्हणाली.
सानियाची केवळ प्रार्थनाला पसंती
महिला दुहेरीसाठी अंकिता रैना,सुंकारादेखील संघात होत्या. मात्र, सानियाने चौघींतून केवळ प्रार्थनाला पसंती दर्शवली. त्यामुळे महिला दुहेरीत सानियासोबत खेळण्यास प्रार्थनाची निवड झाली. या वेळी सानियाने दाखवलेला विश्वास तिने तोडीस तोड खेळी करून सार्थकी लावला. यापूर्वी कझाकिस्तान येथे झालेल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत सानिया-प्रार्थनाने नशीब आजमावले होते.