आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘सचिन’ भेटीच्या हॅट्ट्रिकने प्रेरित - दिनेश कुंटे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - क्रिकेटच्या विश्वात खेळाडू म्हणून सचिन महान आहे. त्याने माणूस म्हणूनदेखील शांत, संयमी स्वभावाने क्रीडाप्रेमींची मने जिंकली आहेत. विक्रमादित्य सचिन तेंडुलकरच्या नावाची जादू अनेकांनी अनुभवली आहे. महान सचिनला भेटण्याची संधी मला एक नव्हे, तर तब्बल तीन वेळा मिळाली. हे माझे नशीबच समजतो, अशा शब्दांत औरंगाबादचा वरिष्ठ क्रिकेटपटू दिनेश कुंटेने आपल्या भावना व्यक्त केल्या.
‘सचिनची पुण्यात झालेली भेट अविस्मरणीय आहे. व्हेरॉक अकादमीचे उद्घाटन सचिन तेंडुलकर आणि भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमात वाटण्यात आलेल्या बुकलेटवर मी धोनीची स्वाक्षरी घेतली. दरम्यान, सचिनची स्वाक्षरी घेण्यासाठी अफाट गर्दी होती. त्याच्या जवळ जाणेही अशक्यअसल्याने मी बाहेर थांबलो होतो. त्यानंतर घरी जाण्यासाठी सचिन कारमध्ये बसला होता. मी जवळ जात त्याला हात दाखवला. त्याने लगेच कारची काच खाली घेतली आणि मला त्याची स्वाक्षरी दिली. हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा क्षण आहे, असा औरंगाबादचा वरिष्ठ खेळाडू दिनेश कुंटेने सचिनच्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. सचिन सोबत ही त्याची तिसरी भेट होती.
सचिनची पायाभरणी मुळात औरंगाबादेत!
सचिनच्या झंझावाती कारकीर्दीची पायाभरणीच मुळात औरंगाबादेत झाली. 14 ते 16 जाने. 1989 दरम्यान औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मैदानावर महाराष्‍ट्र वि. मुंबई रणजी सामना झाला. या सामन्यात सचिनने (81 धावा) धावा काढल्या. या सामन्यापूर्वी सचिनने दिनेश कुंटेसोबत कसून सराव केला. दिनेशने त्या सोनेरी दिवसांची छायाचित्रे आठवण म्हणून आजही जपून ठेवली आहेत. ती सचिनसोबत दिनेशची पहिली भेट होती. त्या सामन्यासाठी वेंगसरकर, शास्त्री, मांजेरकर, सुरेंद्र भावे शहरात आले होते.
साक्षात सचिन भेटीसाठी बाहेर आला
औरंगाबाद, पुण्याचे खेळाडू इंग्लंडला क्लब क्रिकेट खेळायला जाण्यासाठी मुंबई येथे पोहोचले. लक्ष्मण गिरी, दिनेश कुंटे त्या वेळी सोबत होते. सचिनला भेटायचे आहे का ? असे लक्ष्मणने त्या वेळी दिनेशला विचारले. हो म्हणताच सारे मित्र सचिनच्या घरी निघाले. लक्ष्मणने सचिनच्या घरात प्रवेश केला आणि त्याला तो बाहेर घेऊन आला. क्षणभर विश्वासच बसला नाही. सर्वांच्या समोर सचिन तेंडुलकर होता. दिनेशने त्याला पुष्पगुच्छ दिले. सचिनने दिनेशच्या क्रिकेट करिअरची चौकशी करून त्याला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. सचिनसोबत दिनेशची ही दुसरी भेट होती.