इंचियोन - 'मॅग्निफिशंट मेरी कोम' आणि "सुपर मॉम'च्या नावाने सुप्रसिद्ध तीन मुलांची आई एम. सी. मेरी कोमने
आपल्या जोरदार पंचांची बरसात करत कझाकिस्तानच्या झेना शेकेरबेकोवाला त्रस्त करून सोडले. १७ व्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंगमध्ये ४८ ते ५१ किलो वजन गटाच्या फायनलमध्ये मेरीने झेनाला दे दणादण पंच मारून पराभूत करत सुवर्णपदक जिंकले. मेरीने झेनाला २-० ने मात दिली. या विजयाने मेरीने फ्लायवेट गटात आपले वर्चस्व सिद्ध केले. या आशियाई स्पर्धेत बॉक्सिंगमध्ये भारताचे हे पहिले सुवर्णपदक ठरले असून एकूण हे सातवे सुवर्ण आहे.
मेरी कोम आणि झेना यांच्यातील जबरदस्त सामन्याचा निकाल दोन पंचांनी भारतीय खेळाडूच्या बाजूने दिला. एका पंचाने दोन्ही खेळाडूंना सारखे गुण दिले. मेरी कोमने हा सामना ३९-३७, ३८-३८, ३९-३७ ने सहजपणे जिंकला.
झेनाचीही झुंज
पहिल्या फेरीत मेरी कोमला झेनाच्या ब-याच पंचांचा सामना करावा लागला. पहिल्या फेरीनंतर दुस-या फेरीत मेरी कोमने मजबुतीने पुनरागमन केले. मात्र, झेना तिच्यावर पंच मारत होती. तिच्या प्रत्युत्तरात मेरी थोडी दुबळी दिसत होती. असे असताना मेरीने झेनाच्या चेह-यावर काही ठोसे मारून तिच्यावर दबाव निर्माण केला. मेरीने झेनाला एकापाठोपाठ ठोसे मारून गुणांची कमाई केली. चौथ्या आणि निर्णायक फेरीत मेरीने पुन्हा दमदार खेळ केला. तिने आक्रमक खेळ करून सामना आपल्या नावे केला. सामन्यात मेरीने दबाव न घेता आपला अनुभव पणाला लावून खेळ केल्याने फायनल लढतीत भारताला सुवर्ण मिळाले.
"मेरी मेरी'चा जयजयकार
सियोनहाक जिम्नॅशियम हॉलमध्ये बसलेल्या चाहत्यांनी मेरी... मेरी.. ची नारेबाजी करून मेरी कोमला प्रेरित केले. सामन्यादरम्यान चाहत्यांचा जबरदस्त पाठिंबा मेरी कोमच्या कामी आला.
मेरी कोमचे खास यश
मेरी कोमने ग्वांगझू एशियाडमध्ये कांस्यपदक जिंकले होते. याशिवाय एशियन चॅम्पियनशिपमध्ये तिने चार वेळा सुवर्ण आणि एक रौप्य जिंकले. इनडोअर आशियाई क्रीडा स्पर्धेत मेरीच्या नावे सुवर्ण आहे. तिने आशिया चषकातही सुवर्ण मिळवले आहे.
अशी पोहोचली फायनलमध्ये
मेरी कोमने राउंड १६ मध्ये कोरियाच्या किम येजी हिला ३-० ने, उपांत्यपूर्व फेरीत चीनच्या हेई जुआनला ३-० ने, तर सेमीफायनलमध्ये व्हिएतनामच्या ली थी बेंगला ३-० ने मात दिली.
पुढे वाचा ....आज हॉकीत भारत-पाक सुवर्णपदकासाठी लढणार