औरंगाबाद - महाराष्ट्रात महिला खेळाडूंचा ‘मेरी कोम’ होण्याच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग अधिकच खडतर असल्याचे चिंताजनक चित्र निर्माण झाले आहे. युवतींना बॉक्सिंगचे धडे देण्यासाठी राज्यात केवळ दोनच महिला एनआयएस प्रशिक्षक (मुंबई येथे) आहेत. याशिवाय शासन स्तरावरही याबाबत माेठी उदासीनता आहे. शासनाचे राज्यात फक्त तीन प्रशिक्षक कार्यरत आहेत.
पाच वेळची वर्ल्ड चॅम्पियन मेरी कोमच्या संघर्षमय जीवनावर आधारित ‘मेरी कोम’ या चित्रपटाने राज्यातील अनेक युवा महिला खेळाडूंना बाॅक्सिंग खेळाकडे वळण्यासाठी प्राेत्साहित केले आहे. मात्र, प्रत्यक्षात या युवा खेळाडूंना महिला प्रशिक्षकांच्या अभावामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहेत. महिला प्रशिक्षकांकडूनच बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेण्याचा पालकांचा अट्टहास असतो.
मेरीप्रमाणेच ‘बॉक्सिंग’चा संघर्ष
मेरी काेमप्रमाणेच सध्या महाराष्ट्रात महिला बॉक्सिंगला
आपले अस्तित्व चमकवण्यासाठी माेठा संघर्ष करावा लागत आहे. मात्र, याकडे शासनासह संघटनेने साफ दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच या खेळात युवा खेळाडूंना चालना मिळण्यासाठी अनेक अडचणी निर्माण झालेल्या आहेत. त्या दूर झाल्यास बॉक्सिंगमध्ये माेठ्या प्रमाणात प्रतिभावंत महिला खेळाडू तयार होतील.
शासनही निरुत्साही
महाराष्ट्र शासनाही राज्यात बॉक्सिंगच्या प्रसाराबाबत निरुत्साही आहे. शासनाने प्रशिक्षणासाठी तीन काेचची (अकाेला, नागपूर, वर्धा) नियुक्ती केली आहे. आहेत. मानधन तत्त्वावर दाेन प्रशिक्षक काम करत आहे.
नाेकरीनंतर खेळाडूंचे बॉक्सिंगकडे दुर्लक्ष
महाराष्ट्रात खेळाडू हे केवळ छंद म्हणून बाॅक्सिंगकडे वळतात. दरम्यान, लागलेल्या नाेकरीनंतर हे खेळाडू बाॅक्सिंग खेळणे साेडून देतात. बाॅक्सिंग खेळणे आणि नाेकरी यांच्यात त्यांना सुव्यवस्थितपणे सांगड घालता येत नाही. त्यामुळे दर्जेदार खेळाडूंकडून युवा खेळाडूंना प्रशिक्षणही मिळत नाही. आम्ही प्रशिक्षक वाढवण्यावर अधिक भर देत आहोत.
जय कवळी, सरचिटणीस