आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिओत बदलणार पदकाचा रंग : मेरी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- लंडन ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगच्या फायनलमध्ये पोहोचू न शकल्याचे दु:ख आहे. मात्र, मी सहजासहजी हार मानणा-यातली नाही. आता ब्राझीलच्या रिओ द जानेरिओ येथे होणा-या ऑलिम्पिक (2016) मध्ये पदकाचा रंग बदलण्याचा प्रयत्न करेन, असे स्टार बॉक्सर एम. सी. मेरी कोमने म्हटले.
बॉक्सिंग पथकाचे प्रायोजक मोनेटकडून आयोजित सत्कार सोहळ्यात मेरी बोलत होती. ‘देशवासींयाकडून मिळालेल्या समर्थनामुळे मी भावुक झाले आहे. मला यापुढेसुद्धा असेच समर्थन मिळेल, अशी आशा आहे. मी रिओत सुवर्ण जिंकण्याचा पूर्ण प्रयत्न करेन,’ असे ती म्हणाली.
स्कोअरिंग सिस्टिममध्ये दोष : या वेळी पुरुष बॉक्सिंगपटू विजेंद्रसिंगही उपस्थित होता. लंडन ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगच्या स्कोअरिंग सिस्टिममध्ये दोष होता, असा आरोप त्याने लावला. यामुळे अनेक निर्णय प्रभावित झाले. मी गेल्या सहा वर्षांपासून मिडलवेट गटात (75 किलो) खेळत आहे. आता मी 81 किलो वजन गटात खेळणार आहे, असे विजेंद्रने स्पष्ट केले.
माझ्यासोबत धोकेबाजी झाली : मला ऑलिम्पिकमध्ये विजयाची पूर्ण आशा होती. मात्र, विरोधी खेळाडूला विजेता घोषित करण्यात आले. माझ्यासोबत धोकेबाजी झाली आहे, हे सर्वांनी मान्य केले आहे. अशा निर्णयामुळे मी खूप निराश झालो. मी याबाबत कोणाशीच बोललो नाही. मी मुकाट्याने आपल्या खोलीत गेलो आणि विचारात बसलो, असे मनोजकुमारने या वेळी नमूद केले.
मेरीचे होणार प्रमोशन..आता बनणार एसपी- मणिपूर शासनाने मेरी कोमसाठी बक्षीस रक्कम वाढवताना ती 50 लाखाहून 75 लाख केली आहे. मुख्यमंत्री इबोबीसिंग यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटने हा निर्णय घेतला. शासनाने तिचे प्रमोशन करताना एसपी बनवण्याचा निर्णय घेतला. सोबतच देवेंद्रोसिंग, बोम्बाल्या देवी आणि सोनिया चानू यांना प्रत्येकी 20 लाख बक्षीस देण्याचे या वेळी ठरले. राज्याच्या या तीन खेळाडूंनी लंडन ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेतला होता.