आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करा किंवा मरा:मुंबई इंडियन्स-कोलकाता नाइट रायडर्स समोरासमोर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध मुंबई इंडियन्सने हाराकिरी केली असली तरीही आता त्यांना एकही पराभव महागात पडू शकतो. स्पर्धा नाजूक वळणावर पोहोचली असून एका पराभवाने मुंबईचे प्ले ऑफचे आव्हान संपुष्टात येऊ शकते. अशा परिस्थितीत मुंबईला गुरुवारी गतचॅम्पियन कोलकाता नाइट रायडर्सशी लढायचे आहे. मुंबईसाठी ही लढत ‘करा किंवा मरा’ अशा स्थितीची असेल. दुसरीकडे मुुंबईला नमवून प्ले ऑफचे स्थान पक्के करण्याचा केकेआरचा प्रयत्न असेल.
सलग पाच विजयांनंतर रविवारी आरसीबीविरुद्ध मुंबईचा झालेला पराभव अडचणीचा ठरला. असे असले तरीही केकेआरविरुद्ध एकूण कामगिरीचा विचार करताना मुंबई इंडियन्सचा आत्मविश्वास बळावलेला आहे. केकेआरविरुद्ध मुंबईचा विजय-पराभवाचा रेकॉर्ड १०-५ असा जबरदस्त आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात केकेआरने मुंबईला ७ विकेटने हरवले होते. आता या पराभवाचा हिशेब चुकता करण्याच्या इराद्याने मुंबई खेळेल.

मागच्या सामन्यात बंगळुरूच्या एबी डिव्हिलर्सने मुंबईच्या गोलंदाजांना धो-धो धुतले. त्याने अवघ्या ५९ चेंडूंत १३३ धावा कुटल्या होत्या. यामुळे मुंबईच्या गोलंदाजांचा आत्मविश्वास खचला असेल. त्यांना केकेआरविरुद्ध नव्या दमाने खेळावे लागेल. मुंबईच्या नावे १२ सामन्यांत ६ विजय आणि ६ पराभवांसह १२ गुण आहेत. त्यांचे दोन सामने शिल्लक असून दोन्हींत विजय मिळवल्यास त्यांचे १६ गुण होतील. अशात प्ले ऑफचा त्यांचा प्रवेश शक्य होईल. दुसरीकडे कोलकाता नाइट रायडर्सच्या नावे १२ सामन्यांत ७ विजयांसह १५ गुण आहेत. केकेआरचा प्ले ऑफचा प्रवेश जवळपास निश्चित असून, गुणतालिकेत सध्या हा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे.

मुंबईसाठी गोलंदाजी चिंतेचा विषय
मुंबई इंडियन्ससाठी त्यांची गोलंदाजी चिंतेचा विषय ठरू शकते. मागच्या सामन्यात डिव्हिलर्स आणि कोहलीच्या तडाख्यापुढे मुंबईचे युवा गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि हार्दिक पंड्या यांना प्रत्येकी ५० पेक्षा अधिक धावा मोजाव्या लागल्या. केकेआरविरुद्ध या दोघांना बहुधा संघाबाहेर जावे लागेल. या दोघांच्या जागी विनयकुमार आणि अभिमन्यू मिथुन या दोघांना संधी मिळू शकते. गोलंदाजांची चूक आता मुंबईला स्पर्धेबाहेर ढकलू शकते. यामुळे या क्षेत्रात गाफील राहून त्यांना जमणार नाही.
पोलार्डमुळे फलंदाजी मजबूत
मुंबई इंडियन्सची फलंदाजी मजबूत आहे. त्यांच्याकडे वेस्ट इंडीजचा भरवशाचा सलामीवीर एल. सिमन्स आहे. मागच्या सामन्यात त्याने शानदार फलंदाजी करताना ६८ धावा ठोकल्या होत्या. याशिवाय वेस्ट इंडीजचाच दुसरा खेळाडू केरोन पोलार्ड मुंबई इंडियन्सचे शक्तिस्थान आहे. याशिवाय पार्थिव पटेल, रोहित शर्मा, अंबाती रायडू, हरभजनसिंग यांच्यावरही फलंदाजीची जबाबदारी असेल.
केकेआर तुल्यबळ संघ
गंभीरच्या नेतृत्वाखाली केकेआरचा संघ संतुलित आणि तुल्यबळ आहे. केकेआरने संपूर्ण स्पर्धेत आपली छाप पाडली आहे. फलंदाजी ही केकेआरची ताकद आहे. गौतम गंभीर (११ सामने २८८ धावा), रॉबिन उथप्पा (११ सामने ३२५ धावा), मनीष पांडेने (११ सामने २०३ धावा) संघाला विजयपथावर आणते. शिवाय युसूफ व रसेलच्या रूपाने दोन उत्तम अष्टपैलू खेळाडू त्यांच्या भात्यात आहेत.