आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फेल्प्स ऑलिम्पिकचा महानायक

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वृत्तसंस्था- बीजिंग ऑलिम्पिकमध्ये एकट्याच्या जिवावर अमेरिकेला आठ सुवर्णपदके पटकावून देणा-या आणि त्याआधी अथेन्समध्येसुद्धा आठ पदके पटकावलेल्या मायकल फेल्प्सने लंडन ऑलिम्पिकमध्ये तीन पदके मिळवून त्याच्या पदकांची संख्या 19 पर्यंत पोहोचविली. मंगळवारी मध्यरात्री 4 बाय 200 मीटर सांघिक प्रकारात सुवर्णपदक पटकावत तो जगातील सर्वात महान ऑलिम्पिकवीर ठरला आहे.
लंडनमध्ये सांघिक प्रकारांमध्ये दोन आणि एक वैयक्तिक रजतपदक पटकावल्याने त्याच्या नावावर ऑलिम्पिकमधील सर्वाधिक म्हणजेच तब्बल 19 पदकांची नोंद झाल्याने तो विश्वविक्रमवीरांचा मुकुटमणी ठरला आहे. जागतिक आश्चर्य दररोज घडत नाही, किंबहुना म्हणूनच त्याला जागतिक आश्चर्य मानले जाते. अगदी तो अतिमानव मानला गेलेला मायकल फेल्प्स असला तरी. मात्र, फेल्प्स हा ‘आजपर्यंतचा सर्वोत्तम ऑलिम्पिकवीर’ असल्याचे फलक लंडनमध्ये झळकावले गेले त्याच्याशी कुणीही असहमत होणार नाही.
फेल्प्सने मंगळवारी रात्री 200 मीटर बटरफ्लाय प्रकारात वैयक्तिक रौप्यपदक जिंकून सर्वाधिक 18 पदके जिंकण्याच्या विक्रमाची बरोबरी साधली. हा विक्रम रशियाची जिम्नॅस्ट लेरिसा लेतिनिनाच्या नावे होता. सुवर्णपदक दक्षिण आफ्रिकेचा चाड ले क्लोसच्या, तर कांस्यपदक ताकेशी मात्सुदाला मिळाले. त्यानंतर त्याने 4 बाय 200 रिले सांघिक प्रकारात अमेरिकेच्या संघासह सुवर्णपदक जिंकून सर्वाधिक 19 पदकांची कमाई करीत सर्वोत्तम ऑलिम्पिकमवीर बनण्याचा बहुमान प्राप्त केला आहे.
27 वर्षीय फेल्प्सने बीजिंग व अथेन्स ऑलिम्पिकमध्ये आठ - आठ पदके जिंकली होती. त्यानंतर लंडन ऑलिम्पिकमध्ये तीन पदके जिंकून त्याने ऑलिम्पिकमधील पदकांचे कीर्तिमान प्रस्थापित केले आहे. फेल्प्सच्या 19 पदकांमध्ये 15 सुवर्ण आहेत. तसेच दोन रौप्य व दोन कांस्यपदकेही त्याच्या नावे आहेत. रशियाच्या लेरिसाने 1956, 1960, 1964 ऑलिम्पिकमध्ये 18 पदके जिंकली होती. त्यामध्ये 9 सुवर्णपदकांचा समावेश होता. फेल्प्सच्या विक्रमाची बरोबरी करणे पुढील काही ऑलिम्पिकमध्ये तरी शक्य वाटत नाही.

‘अजून चार वर्षे’चा जयघोष
फेल्प्स जेव्हा सांघिक प्रकारातील लास्ट लॅपमध्ये त्याच्या लक्ष्याच्या अगदी नजीक होता, त्या वेळी फेल्प्सचे पाठीराखे ‘अजून चार वर्षे, अजून चार वर्षे’चा जयघोष करीत होते. अर्थात फेल्प्सने अजून चार वर्षे म्हणजेच पुढच्या ऑलिम्पिकपर्यंत खेळत राहावे, अशीच त्याच्या पाठीराख्यांची इच्छा आहे.
लंडनमध्ये निराशाच
फेल्प्सने गेल्या दोन ऑलिम्पिकमध्ये जी उंची गाठली होती, ती यंदाच्या स्पर्धेत गाठणे त्याला शक्य झालेले नाही. सांघिकमध्ये दोन पदके आणि वैयक्तिकमध्ये एक पदक ही आकडेवारी त्याच्या दर्जापेक्षा काहीशी कमीच आहे. मात्र, अद्यापही काही प्रकार बाकी असून किमान एक वैयक्तिक सुवर्णासह त्याने पदकांचा आकडा दोन दशकांपर्यंत न्यावा, अशीच चाहत्यांची त्याच्याकडून अपेक्षा आहे.

फेल्‍प्‍सची कामगिरी
अथेन्स ऑलिम्पिक 2004
100 मी. बटरफ्लाय 51.25 सुवर्ण
200 मी. बटरफ्लाय 1.54.04 सुवर्ण
200 मी. वैयक्तिक 1:57:14 सुवर्ण
400 मी. वैयक्तिक 4:08:26 सुवर्ण
4-200 मी. फ्रीस्टाइल रिले 7:07:07 सुवर्ण
4-100 मी. मेडले रिले 3:30:68 सुवर्ण
200 मी. फ्रीस्टाइल 1:45:32 कांस्य
4-100 मी. फ्रीस्टाइल रिले 3:14:62 कांस्य
बीजिंग ऑलिम्पिक 2008
200 मी. फ्रीस्टाइल 1:42:96 सुवर्ण
100 मी. बटरफ्लाय 50.58 सुवर्ण
200 मी. बटरफ्लाय 1.52.03 सुवर्ण
200 मी. वैयक्तिक 1:54:23 सुवर्ण
400 मी. वैयक्तिक 4:03:84 सुवर्ण
4-100 मी. फ्रीस्टाइल रिले 3:08:24 सुवर्ण
4-200 मी. फ्रीस्टाइल रिले 6:58:56 सुवर्ण
4-100 मी. मेडले रिले 3:29:34 सुवर्ण
लंडन ऑलिम्पिक 2012
4-200 मी. फ्रीस्टाइल रिले 6:59:70 सुवर्ण
4-100 मी. फ्रीस्टाइल रिले 3:10:38 रौप्य
200 मी. बटरफ्लाय 1.53.01 रौप्य