आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लंडन आय : तरण तलावाचा चमत्कार!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मायकल फेल्प्सला एखादी गोष्ट करू नको, असे सांगितले की तो ती हमखास करणारच. या हट्टापायी त्याचे स्वत:चे अनेकदा नुकसान झाले आहे, पण तोच हट्ट जगातल्या अन्य जलतरणपटूंसाठीही महागात पडला आहे. त्याला सोबत म्हणून आई तरण तलावावर घेऊन जायची. त्या वेळी लहान होता म्हणून आईने त्याला इतक्यात पोहू नकोस, असे सांगितले होते. मग तो मुद्दामच तरण तलावात उतरला. तो हट्ट जलतरणपटूंना महागात पडला. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्र्धांच्या इतिहासातील सर्वाधिक पदके लुटण्याची कामगिरी त्याने शुक्रवारी केली. 17 वे ऑलिम्पिक सुवर्णपदक त्याने मिळवले. आई-वडील विभक्त झाले आणि मायकलच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. आईनेच दोन मुली आणि मायकलची जबाबदारी घेतली. मायकल इतर मुलांपेक्षा वेगळा होता. शाळेत अभ्यास करायचा नाही. कोणत्याही कामात एकाग्रता होत नव्हती. आपला मुलगा सर्वसामान्यांसारखा नाही हे त्याच्या आईचे दु:ख होते. शाळेतले शिक्षक तक्रार करायचे, मायकलचे वर्गात लक्ष नसते. फक्त वायफळ बडबड करत असतो. आईने नको म्हटले आणि मायकल तरण तलावात उतरला. जमिनीवर त्याची एकाग्रता होत नव्हती, पण पाण्यात त्याला त्याचे विश्व सापडले. तासनतास तो पाण्यातच पोहत राहायचा. त्याच्या बहिणी ऑलिम्पियन जलतरणपटू होऊ शकल्या नाहीत, पण मायकल झाला. अमेरिकेचा विश्वविजेता बटरफ्लाय चॅम्पियन, पाब्लो मोराल्स हा त्याचा हीरो होता. मायकलचा बटरफ्लाय हा म्हणूनच आवडता प्रकार होता. बटरफ्लायमध्ये तो उजवा ठरण्याचे आणखी एक कारण म्हणजे, त्याची शरीरयष्टी. त्यांच्या उंचीच्या तुलनेत हात 7.6 से.मी. अधिक लांब आहेत. याच बटरफ्लाय प्रकाराने त्याने आपल्या ऑलिम्पिक कारकिर्दीतील 17व्या सुवर्णपदकाने शुक्रवारी लंडनमध्ये इतिश्री केली. ऑलिम्पिक पार्कच्या अ‍ॅक्वेटिक सेंटरवर तमाम क्रीडारसिकांनी उभे राहून त्याला मानवंदना दिली. सुवर्णपदक स्वीकारल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्रगीत सुरू होत असताना, मायकल आधी खाली वाकला, जमिनीला नमस्कार केला, हातातली फुले जमिनीवर ठेवली. अमेरिकेचे राष्ट्रगीत सुरू झाले. मायकलचा उजवा हात हृदयावर गेला. डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. मायकलला या क्षणापर्यंत आणून सोडणारी त्याची आई स्टॅँडमधून आपल्या मुलाच्या पराक्रम पाहात होती. त्या आईच्या डोळ्यातूनही अश्रू वाहात होते.
मायकलवर आजही त्याच्या आईचा प्रभाव आहे. कारण तिने त्याच्यासाठी पार केलेली अग्निदिव्ये त्याने पाहिली आहेत. खरे तर बीजिंग ऑलिम्पिकनंतर पुन्हा स्पर्धात्मक जलतरणात येण्यात मायकलला रस नव्हता. आणखी चार वर्षे कशाला तरण तलावावर यायचे, असे त्याला वाटायचे. त्याच्या आईने त्या विचारांपासून त्याला प्रवृत्त केले. 2009, 2010मध्ये त्याला वाटायचे, आपण उगीचच मेहनत करतोय. लंडन ऑलिम्पिक आधी, जेव्हा त्याला सहकारी लोचाटकडून पराभव पत्करावा लागला, तेव्हा त्याच्यातला अहंकार दुखावला गेला. पुन्हा एकदा त्याच्यातला मायकल फेल्प्स जागा झाला. ‘प्रत्येक समस्येचे उत्तर आपल्यातच असते’, हे त्याचे तत्त्वज्ञान आहे. त्यानुसार तो वागतो. समस्यांमधून मार्ग काढतो. दारू पिऊन सिग्नल तोडल्यामुळे झालेली शिक्षा किंवा 2009च्या फेब्रुवारी महिन्यात मारिवाना प्यायल्यामुळे निर्माण झालेला वाद, बंदी यातूनही त्यानेच मार्ग काढला. सध्या फेल्प्स मतिमंदांना मार्ग दाखवणा-या संस्थेचा सक्रिय सदस्य आहे. बाल्टीमोरमधील शाळांमध्ये जाऊन तो प्रेरणास्पद व्याख्याने, भाषणे देतो. जाहिराती, फिल्मबाजी या क्षेत्रापासूनही तो अलिप्त नाही.
‘मायकल फेल्प्स-पूश द लिमिट’ या कॉम्प्युटर गेमचा तो नायक आहे. संगीत त्याला चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरक शक्ती ठरते. प्रत्येक शर्यतीआधी तो संगीताची एखादी धून ऐकतो. त्याच धुंदीत पोहतो. संगीताची ती नशा त्याला विजेतेपदापर्यंत पोहोचवते. लंडन ऑलिम्पिकनंतर सारे काही थांबणार. आयुष्यातील अनेक बंधनांचे पाश आता शिथिल होतील म्हणून तो सध्या खुश आहे. त्याला आयुष्य ‘एन्जॉय’ करायचे आहे. पण... एखादे आव्हान, एखादा चॅलेंजवीर त्याला पुन्हा तरणतलावाकडे खेचू शकेल. कदाचित निवृत्तीनंतरही पुन्हा एकदा तरण तलावावरचा चमत्कार आपल्याला अनुभवता येईल.