डर्बन - मधल्या फळीतील फलंदाज सातत्याने अपयशी ठरत असून ते त्यांच्या प्रतिभेला साजेसा खेळ करू शकलेले नाहीत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत लागोपाठचे दोन सामने पराभूत होण्यामागे हेच अपयश कारणीभूत ठरत असल्याचे मत भारतीय संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने व्यक्त केले.
दक्षिण आफ्रिकेच्या 281 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाला प्रारंभीच 4 धक्के सहन करावे लागले. त्यानंतर अवघ्या 35 षटकांत भारताचा डाव 146 धावांमध्ये संपुष्टात आला. एकही भारतीय फलंदाज चाळिशी पार करू शकला नसल्यानेच भारताला सलग दुस-या सामन्यात मोठा पराभव सहन करावा लागला. गत काही मालिकांमध्ये भारताचे मध्यक्रमाचे फलंदाज चांगली कामगिरी करीत नव्हते. मात्र, सलामीचे फलंदाज चांगली फलंदाजी करीत असल्याने भारताला त्याबाबत फार विचार करावा लागला नाही. आता सगळीच फलंदाजी कोसळू लागल्याने संघावर विचार करण्याची वेळ येऊ लागली आहे, असे माही म्हणाला.
आफ्रिकेकडे सुरेख संगम
दक्षिण आफ्रिकेकडे उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजांचा अनोखा संगम आहे. त्यांचे हे अनोखे मिश्रणच त्यांच्या विजयात यशस्वी ठरत आहे. दुस-या सामन्यातही कॉक आणि आमलाने नाबाद 194 धावांची सलामी दिली, तेव्हा मलादेखील आता हा सामनाही तीनशेवर जाण्याची शक्यता वाटू लागली होती. मात्र, गोलंदाजांनी त्यांना त्यापूर्वीच रोखले. पहिल्या सामन्यातून गोलंदाज शिकले.
खेळपट्टीकडून नव्हती गोलंदाजांना मदत
दुस-या सामन्यात खेळपट्टीकडून जलदगती गोलंदाजांना फारशी मदत मिळत नव्हती, तरीदेखील भारतीय फलंदाज धावा जमवू शकले नाहीत याचा खेद वाटतो. मात्र, गत सामन्याच्या तुलनेत दुस-या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी टाकल्याचे धोनी म्हणाला.