इपोह - जेतेपदाच्या शर्यतीतून बाहेर झालेल्या भारतीय हॉकी संघाने सुलतान अझलनशाह चषक हॉकी स्पर्धेत गुरुवारी कॅनडाला ५-३ गोलने नमवून विजयाचे खाते उघडले. तीन सामन्यांनंतर विजयाचे दान भारताच्या पदरी पडले. ११ एप्रिल रोजी भारताला बलाढ्य ऑस्ट्रेलियाविरुद्ध परीक्षा द्यावी लागणार आहे.
स्पर्धेत चौथा सामना खेळणार्या भारताने दमदार खेळ करून नियमित अंतराने गोल नोंदवले. सामन्यातील अंितम क्वार्टर रोमांचक ठरला. उभय संघांनी आक्रमक खेळ केला. भारताकडून रूपिंदरपाल सिंगने १३ व्या मिनिटाला पहिला गोल करून भारताला १-० ने आघाडी दिली. दुसर्या क्वार्टरमध्येही भारताची आघाडी कायम होती. या क्वार्टरमध्ये रूपिंदरपालने पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्याची नामी संधी गमावली. तिसर्या क्वार्टरच्या दोन मिनिटांनंतर ३२ व्या मिनिटाला कॅनडासारख्या कमकुवत संघाविरुद्ध भारत ४-१ गोलने आघाडीवर होता. मात्र, भारताची बचावफळी खिळखिळी करून कॅनडाने दोन गोल ठोकले.
तीन पराभवांसह भारत बाहेर : भारताला बुधवारी यजमान मलेशियाने पराभूत केल्यामुळे स्पर्धेबाहेर व्हावे लागले. या ‘करा किंवा मरा’ लढतीत भारतीय हाॅकी संघाला खेळाचा स्तर उंचावता आला नाही. यापूर्वी कोरिया आणि न्यूझीलंडने भारताला हरवले होते.