आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mitchell Johnson Said He Wanted To Be Tennis Player

विम्बल्डन जिंकण्याचे स्वप्न होते, आर्थिक अडचणीमुळे टेनिस सोडले : जॉन्सन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वानखेडे स्टेडियमवर किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिशेल जॉन्सनची नेटमध्ये अॅक्शन पाहत होतो. मुंबईच्या उकाड्यात अन्य गोलंदाजांनी १०-१५ मिनिटांत आवरते घेतले. जॉन्सन मात्र तब्बल तासभर घाम गाळत होता. त्या वेळी जॉन्सनकडे पाहताना एक गोष्ट सतत लक्षात येत होती. टेनिसपटू सर्व्हिस करताना जसा उडी घेतो आणि चेंडू सोडतो तशीच साधारण त्याची अॅक्शन होती. क्षणभर डोक्यात एक कल्पना चमकून गेली. १५०च्या वेगाने जॉन्सनने सोडलेल्या चेंडूवर जर टेनिस रॅकेटचा आघात केला तर सर्व्हिस किती वेगात पडेल? सराव संपला. खेळाडू ड्रेसिंग रूममध्ये परतत होते. जाॅन्सनला एकच प्रश्न केला,
‘तुझा आवेश टेनिसपटूसारखा वाटतो.’
उत्तर अपेक्षित नव्हते; पण घडले विपरीत. टेनिसपटूसारखा? त्यानेच प्रश्न केला. मी मूळचा टेनिसपटूच होतो. मला व्यावसायिक टेनिसपटू व्हायचे होते. ऐन तारुण्यात मी क्रिकेटचे नाही तर टेनिसचे धडे गिरवत होतो. मोठमोठ्या टेनिसपटूंचे अनुकरण करीत होतो. विम्बल्डन जिंकणे हे माझे स्वप्न होते. मी १८ वर्षांचा असताना मला भेट म्हणून मिळालेला विम्बल्डन टीशर्ट मी जपून ठेवला आहे, असे जॉन्सन म्हणत होता.

टाउन्सविलच्या धुळीत क्रिकेट खेळण्यापेक्षा जॉन्सनला टेनिस कोर्टवरील वावर अधिक आवडायचा. डाव्या हाताने गोलंदाजी व फलंदाजी करणारा जॉन्सन टेनिस मात्र उजव्या हाताने खेळायचा. टेनिसचे क्षितिज त्याला ब्रिस्बेनला बोलावत होते; परंतु घरची बेताची आर्थिक परिस्थिती आणि स्वत:च्या शहरापासून दूर जाण्यास राजी नसल्यामुळे शेवटी त्याला टेनिसवर पाणी सोडावे लागले. मात्र, त्याने क्रिकेटमध्ये अापल्या काैशल्याच्या बळावर वेगळी अाेळख निर्माण केली.

जाॅन्सन म्हणत होता, टेनिस या खेळाने मला खूप काही दिले. टेनिसमुळे माझा स्टॅमिना वाढला. हालचालींमध्ये वेग आणि सहजसुंदरता, चपळता आली. डोळे आणि हाताच्या हालचाली यांची चांगली सांगड घालायची सवय टेनिसने लावली होती. त्याचा क्रिकेटमध्ये फायदा झाला. क्रिकेट रसिक सुदैवी ठरले, जॉन्सन क्रिकेटमध्येच रुळला. टेनिसचे मात्र नुकसान झाले.