आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्वचषकासाठी जहीर खानला सज्ज राहण्याचे धोनीचे संकेत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आगामी 2015 च्या विश्वचषक स्पर्धेचा भारतीय क्रिकेट संघ घडवण्याच्या प्रयत्नात असलेला धोनी आणि कंपनीला परदेशातील दोन मालिकांमध्‍ये समाधानकारक यश मिळाले नाही. ईशांत शर्मा, मोहंमद शमी, भुवनेश्वर कुमार यांच्यापासून स्टुअर्ट बिन्नी, रवींद्र जाडेजा, आर. अश्विन या नवोदितांच्या कामगिरीचा परदेशातील खेळपट्ट्यांवरचा आलेख फारसा उंचावलेला नाही. टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी नवोदितांच्या परदेशातील कामगिरीबाबत सध्या काळजीत पडला असून त्याने भारताचा अनुभवी मध्यमगती गोलंदाज जहीर खान याला आगामी वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेसाठी स्वत:ला मानसिकदृष्ट्या सज्ज ठेवण्याचे सुचवल्याचे कळते.
तंदुरुस्तीच्या कारणास्तव आठ महिने भारतीय संघाबाहेर बसलेल्या जहीर खानने त्या काळात स्वत:च्या फिटनेसवर प्रचंड मेहनत घेतली. फ्रान्स आणि दक्षिण आफ्रिकेत जाऊन त्याने स्वत:ला शंभर टक्क्यांपेक्षा अधिक तंदुरुस्त केले.
एवढेच नव्हे, तर जहीर खानच्या मैदानातील उपस्थितीमुळे ईशांत शर्मा व मोहंमद शामी या दोन गोलंदाजांना गोलंदाजीतील युक्तीच्या चार गोष्टीही आपल्या ज्येष्ठ गोलंदाजांकडून शिकता आल्या.
टीम इंडिया आणि धोनी यांना जहीरने घेतलेल्या विकेट्स आणि सामान्यांमध्ये केलेली प्रदीर्घ काळ गोलंदाजी यापेक्षाही त्याने मिड आॅन व मिड आॅफला उभे राहून मध्यमगती गोलंदाजांना केलेले मार्गदर्शन मोलाचे वाटले.
जहीरची टिच्चून गोलंदाजी
दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंड दौर्‍यात जहीरची शानदार कामगिरी पाहावयास मिळाली. जहीर खानने या दोन्ही दौर्‍यांमध्ये प्रत्येक कसोटीत त्याच्यापेक्षा तरुण असलेल्या भारतीय गोलंदाजांपेक्षाही अधिक षटके टिच्चून गोलंदाजी केली.
सिमन्सकडून पाठराखण
भारताचे माजी गोलंदाज प्रशिक्षक एरिक सिमन्स यांनीही जहीरची संघातील ज्येष्ठ व मार्गदर्शक गोलंदाजाची भूमिका किती महत्त्वाची आहे ते सांगितले. संघातील सर्वच गोलंदाजांनी 140 च्या पुढे चेंडू फेकायची गरज नसते. कमी वेगात चेंडू टाकणारे गोलंदाजही हवे असतात. जहीरकडे चेंडू जुना झाल्यानंतर रिव्हर्स करण्याची कला आहे. फलंदाजांना बाद करण्यासाठी कसा सापळा लावायचा ते त्याला कळते.