आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • MS Dhoni Ruled Out Of Asia Cup With Injury Virat Kohli To Lead

धोनीला विश्रांती; आशिया चषकासाठी विराट कोहलीकडे नेतृत्व

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बांगलादेशात फेब्रुवारी-मार्च महिन्यात होणार्‍या आशियाई क्रिकेट स्पर्धेत खेळण्यास महेंद्रसिंग धोनी अपात्र ठरल्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे सोपवण्याचा निर्णय राष्ट्रीय निवड समितीने घेतला आहे. यष्टिरक्षणाची जबाबदारी दिनेश कार्तिकवर सोपवण्यात येईल. न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन येथील दुसर्‍या कसोटी क्रिकेट सामन्यादरम्यान धोनीच्या पाठीकडील डाव्या भागाचे स्नायू दुखावले होते. त्या दुखापतीमधून बरे होण्यास किमान दहा दिवसांचा अवधी लागणार, असे डॉक्टरांनी सांगितल्यानंतर निवड समितीने धोनीला विश्रांती देऊन कोहलीला कप्तान करण्याचा निर्णय घेतला.
नोव्हेंबर, फेब्रुवारीत मालिकांचे आयोजन
आयसीसीमधील भारत, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या ‘बिग थ्री’ क्रिकेट बोर्डांनी आयसीसीच्या ‘एफटीपी’ म्हणजे भविष्यकाळातील पूर्वनियोजित कार्यक्रमांच्या जोखडातून आपली सुटका करून घेतली आहे. नव्या व्यवस्थेनुसार यापुढे प्रत्येक वर्षी भारतात नोव्हेंबर आणि फेब्रुवारी या दोन महिन्यांदरम्यान दोन आंतरराष्ट्रीय संघांना भारतात पाचारण करता येईल. या दोन महिन्यांच्या सुमारास भारताला स्वत:च्या इच्छेनुसार हव्या त्या परदेशी संघाला आमंत्रित करता येणार आहे.
सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळ प्रतिवर्षी ऑस्ट्रेलियाला भारतात निमंत्रित करून मर्यादित षटकांच्या मालिकेचे आयोजन करीत असते. मात्र, यापुढे त्यासाठी आयसीसीच्या कार्यक्रमपत्रिकेत या दौर्‍यांची नोंद असणे बंधनकारक नसेल. बीसीसीआय आपल्या मर्जीनुसार व आपल्याला हव्या असलेल्या संघाला निमंत्रित करू शकेल. त्यामुळे बीसीसीआयची आर्थिक आवक मोठ्या प्रमाणात वाढेल. स्टार स्पोर्ट्सबरोबरच्या करारानुसार बीसीसीआयला प्रत्येक सामन्याचे 40 कोटी रुपये मिळणार आहेत.
या बदलामुळे भारतीय संघ इंग्लंड व ऑस्ट्रेलिया या संघांना आळीपाळीने भारतात मालिका खेळण्यासाठी निमंत्रित करू शकेल. मधल्या काळात भारतीय संघाला परदेश दौर्‍यांवर जाता येईल. एप्रिल-मे या दोन महिन्यांच्या कालावधीसाठी बीसीसीआयने आयसीसीकडून आयपीएल ‘व्हिंडो’ याआधीच मिळवली आहे. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे देश वगळता अन्य देशांच्या बोर्डांना मात्र तशी मुभा मिळणार नाही. त्यांना आयसीसीने निश्चित केलेल्या कार्यक्रमानुसारच खेळावे लागेल.
नव्या बदलानुसार आता इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला संधी
इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांनाही नव्या व्यवस्थेनुसार स्वत:च्या मनाप्रमाणे संघांना देशात मालिका खेळण्यासाठी बोलावता येईल. मात्र, भौगोलिक परिस्थितीमुळे इंग्लंड व ऑस्ट्रेलियातील क्रिकेट हंगाम काही महिन्यांपुरताच मर्यादित आहे. ज्या काळात तेथे क्रिकेट नसेल त्या वेळी भारतात जायचे की अन्य देशांचा दौरा करायचा, याबाबतचा निर्णय स्वतंत्रपणे घेण्याची मुभा इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला आहे. त्यामुळे भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हेच संघ यापुढे आपसात अधिक सामने खेळताना पाहावयास मिळतील. या तिन्ही बोर्डांना आयसीसीशी संलग्न असणार्‍या कोणत्याही देशासोबत मालिका खेळता येऊ शकते.