आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई इंडियन्सचा दिल्ली डेअर‍‍डेव्हिल्सवर दणदणीत विजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दिनेश कार्तिक (48 चेंडूंत 86 धावा) आणि रोहित शर्मा (50 चेंडूंत 74 धावा) यांच्या घणाघाती फलंदाजीनंतर गोलंदाजांच्या अचूक मा-याच्या बळावर मुंबई इंडियन्सने मंगळवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सला 44 धावांनी हरवले. कार्तिक, रोहितच्या बळावर आयपीएल सहामध्ये पहिल्यांदा द्विशतकी धावसंख्येची वेस ओलांडण्याचा बहुमान मुंबईला मिळवून दिला.

मुंबईने 5 बाद 209 धावा काढल्या, तर दिल्लीला 9 बाद 165 धावाच काढता आल्या. धावांचा पाठलाग करताना दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरने सर्वाधिक 61 आणि मनप्रीत जुनेजाने 49 धावा काढल्या. इतर फलंदाजांनी निराशा केली. उन्मुक्त चंद 0, जयवर्धने 3, जीवन मेंडिस शून्यावर बाद झाले. जॉन्सन, ओझा आणि पोलार्ड यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.

तत्पूर्वी, धावसंख्येवर एकही धाव लागली नसताना कर्णधार पाँटिंग आणि त्यानंतर एका धावेच्या अंतराने सचिन तेंडुलकर हे मुंबईचे दोन आधारस्तंभ कोसळले. नंतर कार्तिक आणि रोहितने दिल्लीच्या गोलंदाजांना बदडून काढले. आशिष नेहरा, मोर्ने मॉर्कल, इरफान पठाण आणि उमेश यादव यांच्या वेगवान गोलंदाजीचा समाचार कार्तिक व रोहित यांनी घेतला. कार्तिकने आखूड टप्प्याचे चेंडू हूक केले तर काही लॉफ्टेड ड्राइव्हजही मारले. कार्तिकने 14 चौकार आणि 2 षटकार मारले, तर रोहितने 5 षटकार आणि 4 चौकार मारून जबरदस्त फलंदाजी केली. केरॉन पोलॉर्डची बॅट अपेक्षेप्रमाणे तळपली नाही. मात्र अंबाती रायडूने 8 चेंडूंत 2 षटकार व 2 चौकार मारून 24 धावांची अनपेक्षित खेळी केली. त्यामुळे मुंबईने 20 षटकांत 5 बाद 209 धावा फटकावल्या.

आता दिनेश कार्तिककडे ऑरेंज कॅप
मुंबईचा विकेटकीपर फलंदाज दिनेश कार्तिकने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार विराट कोहलीकडून आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढल्यानंतर मिळणारी ऑरेंज कॅप हिसकावली आहे. कोहलीने मंगळवारी सनरायझर्सविरुद्ध नाबाद 93 धावांची खेळी करून ऑरेंज कॅप मिळवली होती. कोहलीच्या नावे तीन सामन्यांत 163 धावा आहेत. ही कॅप कोहलीकडे फक्त एक तास राहू शकली. यानंतर कार्तिकने दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध 86 धावा ठोकून ऑरेंज कॅप आपल्या ताब्यात घेतली. कार्तिकच्या नावे आता तीन लढतींत 183 धावा झाल्या आहेत.
संक्षिप्त धावफलक : मुंबई 5 बाद 209 (कार्तिक 86, रोहित 74), वि.वि. दिल्ली 9 बाद 165. (वॉर्नर 61, जुनेजा 49).