आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - येत्या 6 ते 10 फेब्रुवारी या कालावधीत मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणा-या शेष भारत संघाविरुद्धच्या इराणी करंडक क्रिकेट सामन्यासाठी मुंबईने आज आपला संघ जाहीर केला. भारतीय संघातर्फे खेळत असलेले रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे हे फलंदाज मुंबई सघात परतल्यामुळे यंदाच्या रणजी विजेत्यांची फलंदाजीतील ताकद आणखी वाढली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत खेळण्यासाठी उत्सुक असलेल्या सचिन तेंडुलकरने इराणी करंडकाच्या सामन्यात खेळण्याची इच्छा प्रदर्शित केल्यामुळे मुंबई संघाची शक्ती आणखी वाढली आहे.
रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे यांना जागा करून देण्यासाठी अंतिम सामन्यातील मुंबई चमूत असलेल्या सुशांत मराठे आणि निखिल पाटील (ज्युनियर) या खेळाडूंना वगळण्यात आले आहे.
येत्या पाच फेब्रुवारी रोजी मुंबई टीमचा सत्कार
मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रवी सावंत यांनी रणजी विजेत्या मुंबई संघाला 3 कोटी रुपयांची बक्षिसी जाहीर केली आहे. आयसीसीचे, बीसीसीआयचे व मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते रणजी विजेत्यांचा यशोचित गौरव करण्याची योजना आखण्यात आली आहे. येत्या 5 फेब्रुवारी रोजी हा सत्कार होण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या उपलब्धतेवर सारे काही अवलंबून आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या तिजोरीत सध्या खडखडाट आहे. स्टेडियम बांधणीचे कर्ज नुकतेच फिटले असून 12 ते 15 कोटीपर्यंतचे बीसीसीआयकडून येणारे अनुदान तत्काळ अपेक्षित आहे, असे रवी सावंत यांनी सांगितले.
मुंबई संघ असा
अजित आगरकर (कर्णधार), सचिन तेंडुलकर, वसीम जाफर, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, सूर्यकुमार यादव, अभिषेक नायर, शार्दूल ठाकूर, हिल्केन शहा, आदित्य तारे (यष्टिरक्षक), कौस्तुभ पवार, जावेद खान, धवल कुलकर्णी, अंकित चव्हाण, विशाल दाभोळकर.
प्रशिक्षक : सुलक्षण कुलकर्णी.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.