आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणी चषक : मुरली विजयचे शानदार शतक; सेहवाग संघाबाहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रणजी विजेता मुंबई संघ आणि शेष भारत यांच्यात आजपासून इराणी करंडकाला सुरुवात झाली. या सामन्यात मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र शेष भारतीय खेळाडूंनी चांगली सुरुवात करुन मुंबईपुढे मजबूत खेळ केला. शेष भारताने 90 षटकात 5 बाद 330 धावा केल्या आहेत. सुरेश रैना (36) आणि हरभजनसिंग (0) दिवसअखेर नाबाद आहेत. सलामीवीर मुरली विजयने शानदार शतक झळकावत 116 धावा ठोकल्या.

आज सकाळी शेष भारताची सलामीची जोडी शिखर धवन व मुरली विजय यांनी 144 धावांची जोरदार सलामी दिली. धवनने 101 चेंडूत 11 चौकारासह 63 धावा केल्या. मनोज तिवारीने 67 चेंडूत 7 चौकारासह 37 धावा केल्या. मात्र एक बाजू लावून धरीत विजयने 206 चेंडूत 17 चौकार व 1 षटकारांसह 116 धावा केल्या. मुरली विजय व मनोज तिवारीला अष्टपैलू अभिषेक नायरने बाद केले.
दरम्यान, आज सकाळी शेष भारताचा कर्णधार विरेंद्र सेहवाग पोटदुखीमुळे संघातून बाहेर झाला. त्याच्याकडे शेष भारताचे कर्णधारपद सोपवले होते. मात्र, आज अचानक त्रास झाल्याने त्याने संघाबाहेर राहणे पसंत केले. सेहवागऐवजी आता ऑफस्पिनर हरभजनसिंगकडे नेतृत्त्व देण्यात आले आहे. यंदाच्या रणजी विजेत्या मुंबई संघात सचिन तेंडुलकरसह, झहीर खान, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, अभिषेक नायर व वसिम जाफरसारख्या खेळाडूंचा समावेश आहे.

हरभजनसिंगसह सुरेश रैनाला या सामन्याद्वारे दमदार कामगिरी करुन 22 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु होणा-या चार कसोटी सामन्याच्या मालिकेसाठी दावेदारी करता येणार आहे. त्यासाठी हरभजनसह रैनाला चमकदार कामगिरी करावी लागेल.