मुंबई - ‘सर्वोत्तम क्रिकेट, स्पर्धात्मक क्रिकेट आणि सक्षम आर्थिक पाठबळ याची हमी आयसीसीच्या 52 सदस्यीय संपूर्ण कौन्सिलला देऊन भारताचे वादग्रस्त क्रिकेट संघटक एन. श्रीनिवासन यांनी आयसीसीच्या नवनियोजित चेअरमनपदाचा स्वीकार केला. मेलबर्न (ऑस्ट्रेलिया) येथे झालेल्या आयसीसीच्या वार्षिक सभेत 52 सदस्यी मंडळाने आयसीसीच्या चेअरमन आणि अन्य पदांच्या नियुक्तीसाठीच्या सिंगापूरच्या बैठकीतील घटना बदलाला मान्यता दिली. त्यामुळे आयसीसीचे पहिले चेअरमन म्हणून एन. श्रीनिवासन पदभार स्वीकारतील. आयसीसीचे अध्यक्ष (प्रेसिडेंट) म्हणून बांगलादेशच्या मुश्ताक कमाल यांना आगामी वर्षाकरिता नियुक्त करण्यात आले आहे.
ऑस्ट्रेलियाचे वॅली एडवर्ड्स कार्यकारी समितीचे चेअरमन असतील, तर अर्थ व वाणिज्य व्यापारविषयक निर्णय घेणार्या समितीचे अध्यक्षपद इंग्लंडच्या जाइल्स क्लार्क यांच्याकडे असेल.
मुश्ताप्पा कमाल हे आयसीसीचे 11 वे अध्यक्ष असतील. मात्र, आतापर्यंत केवळ रबरी शिक्षा असे मानले गेलेले हे पद यापुढेही केवळ नामधारी पदच राहणार आहे. एन. श्रीनिवासन (भारत), वॅली एडवर्ज (ऑस्ट्रेलिया) व जाइल्स क्लार्क (इंग्लंड) या क्रिकेटमधील तीन बड्या देशांची यापुढे मक्तेदारी वाढणार आहे. या तीन पदांवर या देशाचे प्रतिनिधीच यापुढे 2-2 वर्षांच्या कालावधीत निवडले जातील.
माझी प्रतिमा स्वच्छ
मी स्वत: कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामुळे माझी प्रतिमा स्वच्छ आहे. सत्य काय आहे ते चौकशीअंती बाहेर येईलच. भ्रष्टाचाराचे आरोप माझ्या जावयावर आहे. त्याने स्वत: बचाव करायचा आहे. त्याच्यावरील आरोपही सिद्ध झालेले नाहीत. माझा केवळ जावई एवढाच त्याच्याशी संबंध आहे. त्याच्या भ्रष्टाचाराशी नाही. शिवाय चौकशी पूर्ण होईपर्यंत मी स्वत:हून दूर राहण्याचा निर्णय घेतला, न्यायालयाच्या आदेशानुसार नाही,’ असेही श्रीनिवासन म्हणाले.