मुंबई - राज्यात भाजपला बाहेरून पाठिंब्याची घोषणा करून खळबळ उडवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आता क्रिकेटच्या पिचवर भाजपसोबत आघाडी करण्यासाठी "फील्डिंग' लावण्याच्या बेतात आहेत. बीसीसीआयची सत्ता स्वत:च्याच हातात ठेवण्याच्या महत्त्वाकांक्षेने झपाटलेल्या एन. श्रीनिवासन यांना रोखण्यासाठी शरद पवार यांनी अनुभवी दालमिया यांना हाताशी धरले असून भाजपच्या बड्या मंडळींना क्रिकेटमधील भ्रष्टाचार रोखण्यासाठी साथ देण्याची साद घातली आहे.
शरद पवार आणि भाजपचे केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचे बीसीसीआयमधील संबंध जवळचे व जिव्हाळ्याचे आहेत. भाजपाध्यक्ष
अमित शहा यांनाही परिस्थितीची कल्पना आहे. देशातील क्रिकेट श्रीनिवासन यांच्या भ्रष्ट कार्यपद्धतीत या पुढील तीन वर्षांसाठी अडकून पडू नये यासाठी अमित शहा आणि भाजपकडील बीसीसीआयची असलेली मते निर्णायक ठरणार आहेत.
पाठिंब्याची गोळाबेरीज
विदर्भाचे शशांक मनोहर, उत्तर प्रदेशचे राजीव शुक्ला, सौराष्ट्राचे निरंजन शहा, मध्य प्रदेश, जम्मू -काश्मीर, महाराष्ट्राचे अजय शिर्के, पंजाबचे बिंद्रा हे शरद पवारांचे कडवे समर्थक आहेत. भाजपने पवार यांच्याशी आघाडी केली तर अमित शहा यांचे गुजरातचे मत, केंद्राच्या अखत्यारितील रेल्वे, सेनादल व युनिव्हर्सिटी यांची तीन मते अनुराग ठाकूर (हिमाचल प्रदेश), जेटलींचे समर्थक दिल्लीचे स्नेह बन्सल, झारखंडचे भाजपचे अमिताभ चौधरी ही मते निर्णायक ठरू शकतात. गोव्यातील भाजप सरकारच क्रिकेटचे भवितव्य ठरवणार आहे. आंध्रचे जी. गंगा राजू भाजपचे खासदार असून पवार समर्थक आहेत.
क्रिकेटमध्ये पुन्हा पवार यांची पॉवर दिसण्याची आशा
पवार, दालमिया, भाजप एकत्र आल्यास
- पश्चिम विभाग : मुंबई, महाराष्ट्र, गुजरात, सौराष्ट्र, बडोदे (सीसीआय तळ्यात-मळ्यात) (किमान ५ मते)
- मध्य विभाग : राजस्थान, विदर्भ, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, रेल्वे (किमान ५ मते)
- उत्तर विभाग : सेनादल, जम्मू-काश्मीर, युनिव्हर्सिटी (एकूण ३ मते)
- दक्षिण विभाग : गोवा व आंध्र प्रदेश (भाजप राज्य)
- पूर्व विभाग : बंगाल, त्रिपुरा, झारखंड, नॅशनल क्रिकेट क्लब (किमान ४ मते)
श्रीनिवासन यांना असे समर्थन मिळू शकेल...
- पश्चिम विभाग : एकही नाही.
- मध्य विभाग : एकही नाही.
- उत्तर विभाग : पंजाब, हरियाणा, हिमाचल, दिल्ली (हिमाचल, दिल्ली भाजपच्या आदेशाने पवारांच्या बाजूला येऊ शकतील)
- दक्षिण विभाग : तामिळनाडू, कर्नाटक, हैदराबाद व केरळ.
- पूर्व विभाग : आसाम व ओरिसा.
- बंगालचे दालमिया यांचे मत, नॅशनल क्रिकेट क्लबचे मत अशी दोन मते श्रीनिवासन यांच्याविरुद्ध जाऊ शकतात. आसामही श्रीनिंच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे.
खेळ मांडियेला...
हेही आहे महत्वाचे….
- बीसीसीआयमधील श्रीनिवासन यांच्या त्याच मक्तेदारीला, दादागिरीला आव्हान देण्यासाठी पवारांनी जुळवाजुळव व प्रबोधन सुरू केले आहे.
- मतांची गोळाबेरीज जुळली आणि भाजपने पवारांच्या क्रिकेटमधील भ्रष्टाचार व श्रीनिवासन हटाव मोहिमेला प्रतिसाद दिल्यास फरक पडू शकेल.
- बीसीसीआयची वार्षिक सर्वसाधारण सभा व निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे. पूर्व विभागाची अध्यक्षपद भूषवण्याची पाळी आहे. श्रीनिवासन यांना पूर्व विभागाच्या २ सदस्यांचे समर्थन हवे आहे.
- मुद्गल समितीच्या चौकशीचा अंतिम अहवाल येत्या ३ नोव्हेंबरला जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये श्रीनिवासन दोषी आढळल्यास हे चित्र क्षणार्धात पालटले जाईल.
- मात्र श्रीनिवासन दोषी आढळले नाहीत तर मोकाट सुटतील. मतदात्यांवर सोयी-सवलती यांचा वर्षाव व दडपण आणून पुन्हा तीन वर्षांसाठी बीसीसीआयचे अध्यक्ष बनू शकतील. याबाबत सध्या काहीच निश्चित नाही.