आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Narsingh Made Victory's Hatrick, Afeter Wining Gada Gifted

नरसिंगची विजयी हॅट्ट्रिक, विजयानंतर चांदीची गदा भेट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - मुंबईच्या भारतीय क्रीडा प्राधिकरणाचा खेळाडू व जसवंतसिंग यांचा पठ्ठ्या नरसिंग यादवने पुन्हा कुस्तीचे मैदान गाजवले. सुनील साळुंकेवर 8-0 अशा गुणफरकाने मात करीत नरसिंगने महाराष्‍ट्र कुस्ती केसरी स्पर्धेची विजयी गदा पटकावली. हजारो चाहत्यांच्या खचाखच गर्दीने भरलेल्या भोसरीच्या मैदानावर नरसिंगने चाहत्यांच्या अंगावर शहारे आणणारा खेळ केला. महाराष्‍ट्र केसरी स्पर्धा तिस-यांदा जिंकून नरसिंग यादवने विजयी हॅट्ट्रिक केली आहे. त्यापूर्वी अकलूज (2011), गोंदिया (2012) येथे या स्पर्धेत बाजी मारली होती.


असा जिंकला नरसिंग
फायनलमध्ये कोण जिंकणार, या एका प्रश्नाने हजारो चाहत्यांना ग्रासले होते. राष्‍ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या नरसिंगने या प्रश्नाचे उत्तर अवघ्या 1.45 मिनिटांत दिले. प्रत्येकी तीन मिनिटांचे दोन राउंड होणार होते. मात्र, नरसिंगने पहिल्या राउंडमध्ये अडीच मिनिटांतच सामना जिंकून आपणच राज्यात वरचढ असल्याचे सिद्ध केले. दोघांत कुस्ती लागताच नरसिंगने सुरुवातीला सुनीलचा पाय पकडून एकेरी पट काढण्याचा प्रयत्न केला. यामुळे त्याला 2 गुण मिळाले. पुन्हा कुस्ती लागली. आक्रमण करीत नरसिंगने विरोधी पहिलवानाला बाहेर नेले. नरसिंगला आणखी एक गुण मिळाला. पंचांनी पुन्हा कुस्ती लावली. नरसिंगने दुहेरी पट काढला. आणखी दोन गुणांची कमाई झाली. यानंतर सुनीलवर एकलंगी डाव टाकत त्याला चीत करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात नरसिंगने विरोधी पहिलवानाला सर्कलबाहेर फेकले. नरसिंगला आणखी दोन गुण मिळाले. अवघ्या 1.45 मिनिटांत नरसिंगच्या नावे 8 गुण जमा झाल्याने पंचांनी त्याला विजयी घोषित केले.


पंचांनी घेतला टेक्निकल कॉल
कुस्तीच्या नियमानुसार पहिल्याच राउंडमध्ये एखाद्या मल्लाने निर्विवादपणे 7-0 ने आघाडी घेतली असेल तर पंच स्वत:हून निर्णय घेऊन त्या मल्लाला विजयी घोषित करू शकतात. याला कुस्तीच्या भाषेत टेक्निकल कॉल असेही म्हटले जाते. नरसिंग- सुनील यांच्या फायनल सामन्यातही असेच झाले. नरसिंगने 8-0 ने आघाडी घेतल्याने पहिला राउंड पूर्ण होण्यापूर्वीच पंचांनी त्याला गुणांच्या आधारे विजयी घोषित केले.


विजयानंतर जल्लोष
नरसिंगने 8-0 अशी आघाडी घेतल्याचे लक्षात येताच त्याच्या आनंदाला उधाण आले. विजयाच्या आनंदात नरसिंगने दोन्ही हातावर उलटी उडी मारली. कुस्ती सर्कलच्या चारही बाजूने फेरी मारून त्याने सर्व चाहत्यांना अभिवादन केले. नरसिंगच्या विजयानंतर चाहत्यांनीही एकच जल्लोष केला. त्याला खांद्यावर उचलून आनंद व्यक्त करण्यात आला.