आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हॉकीसुद्धा ऑलिम्पिकमधून बाहेर होण्याच्या मार्गावर होती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारताचा राष्‍ट्रीय खेळ हॉकीसुद्धा ऑलिम्पिकमधून बाहेर होण्याच्या मार्गावर होता. हॉकीवरही कुस्तीप्रमाणे धोक्याची टांगती तलवार होती. आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या (आयओसी) कार्यकारी मंडळाची लुसाने येथे बैठक झाली. या बैठकीच्या चार फे-यानंतर हॉकीला संजीवनी मिळाली. बैठकीत कुस्तीला बाहेर करण्यासाठी सर्वाधिक मते पडली.

बैठकीत कुस्ती, आधुनिक पेंटाथलॉन, हॉकी, कॅनॉइंग आणि तायक्वांदो यापैकी एका खेळाला ऑलिम्पिकबाहेर करण्यासाठी चार फे-यांत मतदान झाले. आयओसीचे अध्यक्ष जॅक रोगे यांनी आपले मतदान केले नाही.
पाकिस्तानच्या ऑलिम्पिक संघावरही लागू शकते बंदी आंतरराष्‍ट्रीय ऑलिम्पिक समिती पाकिस्तानवर बंदी घालण्याच्या विचारात असल्याचे वृत्त आहे. यामुळे पाक क्रीडाजगत हादरले असून पाकिस्तानच्या 20 क्रीडा महासंघांनी पाकिस्तान ऑलिम्पिक महासंघाचे (पीओए) अध्यक्ष आरिफ हसन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पाकिस्तानी क्रीडा महासंघांनी पीओएमध्ये आपली एक अंतरिम समिती तयार करून एका महिन्याच्या आत निवडणुका घेण्यासाठी शासनाच्या मदतीने निवृत्त न्यायाधीशांची एक समिती गठित केली आहे. हसन 2004 पासून पीओएचे अध्यक्ष असून आपली खुर्ची सोडण्यास ते तयार नाहीत. त्यांना जवळपास सर्वच क्रीडा महासंघांचा विरोध आहे. यादरम्यान भारताप्रमाणे पाकिस्तानातही ऑ लिम्पिकच्या कारभारात शासकीय हस्तक्षेप वाढल्याने पीओएवर बंदी लावण्याच्या विचारात आयओसी आहे.

ऑलिम्पिक बंदीचा अर्थ
याचा अर्थ स्पष्ट आहे की, राष्‍ट्रीय ऑलिम्पिक संघटनेला आयओसीची कसलीच आर्थिक मदत मिळणार नाही. बंदी असलेल्या संघटनेचा एकही अधिकारी आयओसीच्या बैठकीत उपस्थित राहू शकत नाही. शिवाय त्या देशाचे खेळाडू आपल्या देशाच्या ध्वजाखाली ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होऊ शकत नाही.

असे कुस्तीवर आले संकट
पहिल्या फेरीच्या मतदानात कॅनॉइंग हा खेळ सुरक्षितपणे बाहेर निघाला. पुढच्या फेरीत तायक्वांदो खेळसुद्धा वाचला. आता उर्वरित तीन खेळांपैकी एकाचे बाहेर पडणे निश्चित होते. कुस्तीला बाहेर करण्यासाठी सर्वाधिक आठ मते पडली. हॉकी आणि पेंटाथलॉनच्या विरोधात प्रत्येकी तीन मतदान झाले.
यानंतर कुस्तीला ऑ लिम्पिक बाहेर करण्याची शिफारस झाली. हॉकी आणि पेंटाथलॉन खेळ थोडक्याने बचावले.

‘कुस्ती-ऑलिम्पिकसोबत’
कुस्ती आणि ऑलिम्पिक सोबतच चालत आले आहे. ऑलिम्पिकमधून तुम्ही जर मूळ खेळांना दूर केले तर याचा अर्थ तुम्ही ऑलिम्पिक बदलत आहात, असे होईल. असे व्हायला नको.
कोएल सेंडरसन, अथेन्स ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता अमेरिकेचा मल्ल.

यामुळे हॉकी वाचली
हॉकीच्या बाजूने एक मोठी गोष्ट होती. ती म्हणजे सध्याच्या पदक विजेत्या देशांत जर्मनी, स्पेन, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडसारख्या देशांचा समावेश आहे. पेंटाथलॉनच्याबाबतही हाच निकष कामी आला. आयओसीचे माजी अध्यक्ष जुआन समारांच यांचा मुलगा जुआन अँटोनियो समारांच ज्युनियर मॉडर्न पेंटाथलॉन महासंघाचा उपाध्यक्षसुद्धा आहे. शिवाय त्याचा आयओसीच्या कार्यकारी मंडळातही समावेश आहे. त्याच्यामुळे हा खेळ बचावला.

फेसबुकच्या मदतीने मिळवणार कुस्तीला समर्थन
ऑलिम्पिकमधून कुस्तीला बाहेर करण्याच्या शिफारशीला आंतरराष्‍ट्रीय कुस्ती जगतातून जोरदार विरोध झाला आहे. आम्ही आता कुस्तीला समर्थन मिळवण्यासाठी फेसबुकचे पेज तयार केले आहे. जगभरातील चाहते याचे समर्थन करतील. याचे नाव ‘किप रेसलिंग इन द ऑलिम्पिक’ असे आहे, अशी माहिती अमेरिकन कुस्ती महासंघाचे कार्यकारी अधिकारी रिच बेंडर यांनी म्हटले.

कार्यकारी मंडळात हे आहेत सदस्य :
आयओसीच्या कार्यकारी मंडळात बेल्जियमचे जॅक रोगे यांच्याशिवाय सिंगापूर आणि जर्मनीचे दोन प्रतिनिधी उपाध्यक्ष आणि सदस्य, मोरक्को, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, द. आफ्रिका, स्वीडन, चिनी तैयपै, स्वीत्झर्लंड, आयर्लंड, स्पेन, युक्रेन आणि ग्वाटेमाला या सदस्यांचा समावेश आहे. यापैकी जर्मनी, युक्रेन आणि स्वीडनच्या मल्लांनीच मागच्या 20 वर्षांत कुस्तीत पदके जिंकली आहेत. याचाच अर्थ कार्यकारी मंडळाच्या उर्वरित 15 सदस्यांचे मतदान कुस्तीच्या विरोधात जाणे साहजिक होते. हेच कुस्तीबाबत घडले आणि आठ सदस्यांनी कुस्तीला ऑ लिम्पिकबाहेर करण्याच्या बाजूने मतदान केले.