Home »Sports »Other Sports» National Kabbadi Competition, Maharashtra Both Team Reaches Next Round

राष्‍ट्रीय कबड्डी स्पर्धा: महाराष्‍ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत

क्रीडा प्रतिनिधी | Feb 16, 2013, 23:39 PM IST

  • राष्‍ट्रीय कबड्डी स्पर्धा: महाराष्‍ट्राचे दोन्ही संघ बाद फेरीत

औरंगाबाद- महाराष्‍ट्राच्या मुले व मुलींच्या संघांनी शनिवारी 58 व्या राष्‍ट्रीय कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. मुलींच्या संघाने उत्तर प्रदेशला 42-10 अशा गुणफरकाने पराभूत केले. हरियाणा, पश्चिम बंगाल, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मुलांच्या गटात हरियाणा, कर्नाटक संघांनी प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारली.


शनिवारी झालेल्या ‘फ’ गटाच्या मुलींच्या साखळी सामन्यात महाराष्‍ट्राने उत्तर प्रदेशला 32 गुणांनी नमवले. लढतीत ज्योत्स्ना हडळे, कर्णधार सोनाली हेळवी यांनी उत्कृष्ट चढाई केली, तर आरती बोडखेने जबरदस्त पकड मिळवत संघाला दुसरा विजय मिळवून दिला.

दुस-या सामन्यात पश्चिम बंगालने दिल्लीवर (25-23) अत्यंत चुरशीच्या लढतीत 2 गुणांनी मात केली. बंगालच्या ज्योती सोनाद व अनुश्री मन्ना यांनी उत्कृष्ट चढाईच्या जोरावर संघाला आघाडी मिळवून दिली. इतर सामन्यात कर्नाटकने केंद्रीय विद्यालय संघटनेला 9 गुणांनी नमवले. कर्नाटकने पहिला सामना तब्बल शंभर गुणांनी जिंकला होता. मात्र, दुस-या सामन्यात केंद्रीय विद्यालयाने विजयासाठी कर्नाटकला (51-40) चांगलाच घाम गाळायला लावला. मुलांच्या गटात छत्तीसगडने तामिळनाडूवर 78-14 गुणांनी सहज विजय मिळवला. एकतर्फी झालेल्या लढतीत छत्तीसगडच्या भारत निशादच्या आक्रमक चढाई तर दिनेशकुमारच्या उत्कृष्ट पकडपुढे तामिळनाडूचे खेळाडू टिकू शकले नाहीत. तामिळनाडूला 64 गुणांनी पराभवाचा सामना करावा लागला.

मुलांच्या महाराष्‍ट्र संघाने मध्य प्रदेशला नमवले : मुलांच्या गटात महाराष्‍ट्राने जबरदस्त कामगिरी करत मध्य प्रदेशला 40-24 गुणांनी पराभूत केले. या विजयी कामगिरीसह संघाने बाद फेरीत थाटात प्रवेश केला. विजेत्या संघातर्फे कर्णधार ज्ञानेश्वर सुरवसे, तुषार गावडे यांनी शानदार खेळ केला. मध्य प्रदेशतर्फे अरबिन शर्मा, परविंदर साहूचे प्रयत्न अपुरे पडले. सकाळच्या सत्रात झालेल्या पहिल्या सामन्यात महाराष्‍ट्राला गतविजेत्या हरियाणा संघाकडून 34-16 गुणांनी पराभवाचा सामना करावा लागला.

Next Article

Recommended