आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Shooting Competition: Sumedhkumar Dev Won Gold

राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धा: सुमेधकुमार देवने घेतला सुवर्णपदकांचा वेध

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पुणे - औरंगाबादचा युवा खेळाडू सुमेधकुमार देवने रविवारी ५८ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत पदकांची लयलूट केली. या दोन सुवर्णांसह एका रौप्यपदकाचा समावेश आहे. त्याने वैयक्तिक गटात सुवर्णपदकाचा वेध घेतला. त्याने पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात हे सोनेरी यश संपादन केले. या गटात सुमेधने सर्वाधिक ५३६ गुणांची कमाई करताना पदक आपल्या नावे केले. याशिवाय त्याने सांघिक गटात महाराष्ट्र संघाकडून सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावले.

पुण्याच्या बालेवाडीत ही स्पर्धा आयोजित करण्यात आली. तसेच आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील चॅम्पियन जितू रॉयनेही सुवर्णपदकावर नाव कोरले. त्याने पुरुषांच्या ५० मीटर पिस्तूल प्रकारात सुवर्णपदक जिंकले. त्याने यात १५९० गुण मिळवले. सैन्यदलाचा गुरुपालसिंग रौप्यपदकाचा मानकरी ठरला. सीआयएसएफच्या समशेर जंगला कांस्यवर समाधान मानावे लागले.

तसेच सांघिक गटात सैन्यदलाने बाजी मारली. जितू, जय सिंग आणि मनजितने संघाला सुवर्णपदक मिळवून दिले. सैन्यदलाने एकूण १६५६ गुण मिळवून स्पर्धेत सुवर्णपदकावर नाव कोरले.

‘देव’च्या कृपेने महाराष्ट्राला सांघिक गटात दोन पदके
गुणवंत युवा नेमबाज सुमेधकुमार देवच्या कृपेने यजमान महाराष्ट्र संघ दोन पदकांचा मानकरी ठरला. यात प्रत्येकी एक सुवर्ण व रौप्यचा समावेश आहे. महाराष्ट्राने ५० मी. पिस्तूलच्या सांघिक गटात रौप्यची कमाई केली. सुमेधसह संचित आगाशे आणि विकास धमाने रौप्यपदक निश्चित केले. यजमानांनी या गटात एकूण १५५६ गुणांसह पदक मिळवले. त्यापाठोपाठ महाराष्ट्राने ५० मी. पिस्तूल सिव्हिलियनच्या गटात सुवर्णपदक पटकावले. सुमेध, रांचित कपाडिया व राजेंद्र बागूलने संघाला हे पदक मिळवून दिले.