आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्‍ट्रीय क्रीडा दिन विशेष: हॉकीचा जादूगार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा आज जन्मदिवस. डिसेंबर 1994 पासून देशात 29 ऑगस्ट हा राष्‍ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्ताने...!


देश पारतंत्र्यात असताना मायभूमीसाठी ध्यानचंद यांच्या सैन्याने ऑलिम्पिकची मोहीम फत्ते केली होती. सा-या जगात भारतीय हॉकीवीरांच्या पराक्रमाची वार्ता पसरली होती. ऑलिम्पिक संपल्यानंतरही जर्मनीवासी भारतीय संघाला पाहण्यासाठी, स्वाक्षरी घेण्यासाठी गर्दी करत. जर्मनीचा कर्दनकाळ दस्तुरखुद्द हिटलरलाही
ध्यानचंद यांच्या खेळाची भुरळ पडली होती. ऑलिम्पिकच्या भव्यदिव्य समारोपानंतर बर्लिनच्या ड्यूस सभागृहात हिटलरने हॉकी संघांसाठी शाही मेजवानीचे आयोजन केले. या समारंभात जगज्जेत्या संघाचे सेनापती ध्यानचंद यांना हिटलरने सोन्याचे पदक भेट दिले. तो क्षण सर्वांनाच स्तंभित करणारा होता. हिटलरला आशियातील लोक आवडत नसत. तो त्यांना सन्मानपूर्वक वागणूक देत नसे. जेव्हा ध्यानचंद यांच्याशी हिटलरने हस्तांदोलन केले, तेव्हा सर्वच चकित झाले होते.


मेजवानी सुरू असताना ध्यानचंद व हिटलर यांच्यात सुसंवादही झाला. ध्यानचंद यांच्या खेळाने प्रभावित झालेल्या हिटलरने त्यांच्यापुढे जर्मन सैन्यात जनरल करण्याचा प्रस्ताव ठेवला. ध्यानचंद यांनी तो नम्रपणे नाकारला. त्यांचे जन्मभूमी भारतावर जिवापाड प्रेम होते. मायभूमीपासून दूर राहण्याचा विचारही त्यांच्या मनात कधी आला नव्हता. अटकेपार यशाचे झेंडे फडकवताना देशासाठी आपणही काही तरी केल्याचे समाधान त्यांना लाभत असे. ब्रिटिश सैन्यात चाकरी करीत असले तरी तन आणि मन भारतमातेला अर्पित झाले असल्याने हिटलरसमोर त्यांनी आपल्या देशप्रेमालाच महत्त्व दिले होते. बर्लिन ऑलिम्पिक गाजवल्यानंतर त्यांना ‘जर्मन ध्यानचंद’ ही पदवी बहाल करण्यात आली होती. तरीही भारतीय असल्याचा सार्थ अभिमान त्यांच्या कृतीतून प्रकट होत असे. देशप्रेम, परोपकारी वृत्ती, दयाशीलता, सांघिकपणा ही मूल्ये ध्यानचंद यांच्या रक्तातच होती. खिलाडूवृत्ती त्यांच्या नसानसात होती. मैदानात आणि मैदानाबाहेर त्यांनी कधीच भेदभाव केला नाही. जीवनात शेकडो गोल नोंदवण्याचा पराक्रम करूनही ‘माझ्या सहका-यांनी मला अचूक पास दिल्याने मी गोल करू शकतो’ अशीच त्यांची नि:स्वार्थ वाणी होती.


हॉकीच्या निर्जीव स्टिकला ध्यानचंद सजीव करीत. भारतीय शैलीचे ड्रिबलिंग करीत ते चेंडूला सहजपणे गोलपोस्टपर्यंत नेत. एकदा का ध्यानचंद यांच्या स्टिकला चेंडू चिकटला तर गोल होणार, असे समीकरण जुळले होते. गोलपोस्टकडे नजर ठेवत ते प्रतिस्पर्धी संघाच्या चक्रव्यूहातून बाहेर पडून सहजरीत्या गोल नोंदवीत. पाहणा-याला ही जादूच वाटे. आता चेंडू मध्य रेषेजवळ होता, क्षणात तो गोलपोस्टमध्ये गेलाच कसा? ध्यानचंद मैदानात येताच हा चमत्कार हमखास पाहण्यास मिळे.


ध्यानचंद यांच्या संपूर्ण जीवनात सेनादलातील शिस्तीचा पगडा होता. वेळ पाळण्याला ते अतिशय महत्त्व देत. कोणताही कार्यक्रम असो व काम निघो ते अर्धा तास आधीच तयार असत. सामना खेळायचा असल्यास किंवा समारंभाला जाण्यास कोणी वेळ दिला असेल तर ध्यानचंद वेळेपूर्वीच तयार असत. आपल्यामुळे कोणाची अडचण होऊ नये, त्रास पडू नये याची काळजी ते घेत. ते नेहमीच दुस-याच्या वेळेचा सन्मान करीत. कोणी आपली वाट पाहावी, हे त्यांना जराही रुचत नसे. जागतिक यशानंतरही दुस-यांच्या वेळेला
महत्त्व देणारे ध्यानचंद यांच्यासारखे रत्न दुर्मिळच म्हणावे लागेल.


ध्यानचंद यांचा परिचय
पूर्ण नाव : ध्यानचंद सोमेश्वरसिंह बैस
मूळ नाव : ध्यानसिंह
जन्म गाव : अलाहाबाद, उत्तर प्रदेश
जन्म तारीख : 29/08/1905
शिक्षण : सहावीपर्यंत


थोडक्यात जीवनपट
1922 : सेनादलात शिपाईपदावर नोकरीस सुरुवात
1928 : अ‍ॅमस्टरडॅम ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक
1932 : लॉस एंजलिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक
2 मे 1935 : डॉन ब्रॅडमन यांची ऑस्‍ट्रेलियात भेट
1935 : ऑलिम्पिक सुवर्णाची हॅट्ट्रिक, भारतीय संघाचे नेतृत्व
6 ऑक्टोबर 1956 : राष्‍ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित
2 डिसेंबर 1979 : कॅन्सरच्या आजाराने निधन.