आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ndia Vs Australia Hyderabad Cricket 2nd Test Match

भारतासमोर कांगारू बॅकफूटवर; भुवनेश्वर चमकला, क्‍लार्कचे शतक हुकले

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद- दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशीच ऑस्ट्रेलियन टीम भारतीय गोलंदाजांसमोर बॅकफूटवर आली. भारतीय गोलंदाजांनी दमदार प्रदर्शन करताना अवघ्या 237 धावांत ऑस्ट्रेलियाचे 9 गडी बाद केले. मध्यमगती गोलंदाजी भुवनेश्वरकुमारने 53 धावांत 3 तर डावखुरा फिरकीपटू रवींद्र जडेजाने 33 धावांत 3 गडी बाद करून कांगारूंवर दबाव वाढवला. प्रतिकूल परिस्थितीतही ऑस्ट्रेलियन कर्णधार मायकेल क्लार्कने 91 धावांची खेळी केली.
सकाळी राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. हैदराबादची खेळपट्टी सुरुवातीला दोन दिवस फलंदाजांना मदत करेल आणि नंतर येथे फिरकीपटू दादागिरी करतील, असे बोलले जात होते. मात्र, भारतीय गोलंदाजांसमोर ऑस्ट्रेलियन टीम 9 बाद 237 धावा अशी संकटात सापडली होती. पहिल्या दिवसाचा खेळ संपायला पाच षटके शिल्लक असताना क्लार्कने भारताची एखादी विकेट घेण्याच्या इराद्याने आपला डाव घोषित केला. मात्र, क्लार्कची रणनीती पूर्णत: फ्लॉप गेली.

भुवनेश्वर चमकला
युवा मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमारने शानदार स्विंग गोलंदाजी केली. त्याने डेव्हिड वॉर्नर (6), एड. कोवान (4) आणि शेन वॉटसन (23) या तीन महत्त्वाच्या विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरला हादरे दिले. सकाळी टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या कांगारूंनी जेवणाच्या ब्रेकपर्यंत 83 धावांत 4 विकेट गमावल्या होत्या. मात्र, पाहुण्यांनी लंचब्रेकनंतर दोन तासांच्या खेळात 104 धावा जोडल्या आणि एकही विकेट पडू दिली नाही. चहापानाच्या ब्रेकनंतर पुन्हा नाट्यमय खेळ झाला. ऑस्ट्रेलियाने अवघ्या 50 धावांच्या अंतरात 5 विकेट गमावल्या. एका टोकाहून एकेक गडी बाद होत असताना दुसर्‍या टोकाने क्लार्कने शतकाकडे वाटचाल करीत होता.

क्लार्क-वेडची शतकी भागीदारी
मायकेल क्लार्क आणि मॅथ्यू वेड (62 धावा) यांनी पाचव्या विकेटसाठी 145 धावांची भागीदारी करून ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला. मात्र, ही भागीदारी मोडताच ऑस्ट्रेलियाचे एकेक गडी बाद होत गेले. ऑस्ट्रेलियाची टीम 4 बाद 208 अशा सुस्थितीत असताना लवकरच 9 बाद 236 अशा संकटात सापडली. ऑस्ट्रेलियाच्या तिसर्‍या सत्रात दबाव निर्माण करण्याचे श्रेय हरभजन (2/52) आणि जडेजा (3/33) यांना जाते. दोघांनी या सत्रात पाच विकेट घेतल्या.

अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली
अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणे, हे माझे मुख्य लक्ष्य होते. मी ते काम केले. यामुळेच मला ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन विकेट मिळाल्या. विकेट संथ होती आणि चेंडू खाली राहत असल्याने माझे काम झाले. माझी योजना यशस्वी ठरली, अशी प्रतिक्रिया भुवनेश्वरकुमारने व्यक्त केली.

यामुळे डाव घोषित केला
कर्णधार क्लार्कने पहिल्या दिवशी अखेरची पाच षटके शिल्लक असताना भारताच्या विकेट घेण्याच्या इराद्याने आपला डाव घोषित केला. मात्र त्यांना यश मिळाले नाही. एखाद्या संघाचा कमी स्कोअर असतानासुद्धा त्याच्या कर्णधाराने डाव घोषित करण्याचा साहसी निर्णय क्वचितच बघायला मिळतो.

धोनीने किरमाणीचा विक्रम मोडला
महेंद्रसिंग धोनीने भारतीय भूमीवर कोणत्याही विकेटकीपरकडून सर्वाधिक झेल पकडण्याचा सय्यद किरमाणीचा विक्रम मोडला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध दुसºया कसोटीच्या पहिल्या दिवशी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनच्या चेंडूवर त्याने फिलिप ह्युजेसचा झेल घेतला. यासह त्याने किरमाणीच्या 89 झेल घेण्याचा विक्रम मागे टाकला. धोनीने यानंतर रवींद्र जडेजाच्या चेंडूवर ग्लेन मॅक्सवेलचा झेल घेऊन भारतीय भूमीवर आपल्या झेलांची संख्या 91 पर्यंत पोहोचवली. धोनीच्या नावे आता 75 कसोटींत 237 बळी झाले आहेत. यात 205 झेल आणि 32 यष्टिचीत आहेत.नेतृत्वासाठी धोनी सर्वश्रेष्ठ : लक्ष्मण
महेंद्रसिंग धोनीसोबत तणावपूर्ण संबंध असल्याच्या चर्चेला भारताचा माजी कर्णधार व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने विराम दिला आहे. झारखंडचा हा खेळाडू टीम इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी आज सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे, असे त्याने म्हटले. लक्ष्मणने आपले नवे पुस्तक ‘टॉकिंग क्रिकेट’च्या प्रकाशनप्रसंगी हे मत व्यक्त केले.

धोनी शानदार क्रिकेटपटू : डीन जोन्स
ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू डीन जोन्सने महेंद्रसिंग धोनीची स्तुती केली आहे. भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनीत सचिन तेंडुलकर आणि सईद किरमाणी यांच्यासारखे आकर्षण नसले तरीही तो शानदार क्रिकेटपटू असल्याचे त्यांनी म्हटले. ‘सिडने मॉर्निंग हेरॉल्ड’ मध्ये लिहिलेल्या आपल्या लेखात जोन्सने ही स्तुती केली.

भुवनेश्वरकुमारने केली अनोखी हॅट्ट्रिक
क्रिकेटच्या सर्व स्वरूपात आपली पहिली आंतरराष्‍ट्रीय विकेट क्लीन बोल्ड (त्रिफळाचीत) करून घेणारा भुवनेश्वर जगातला पहिला आणि एकमेव गोलंदाज ठरला आहे. जी कामगिरी शेन वॉर्न, ग्लेन मॅकग्रा, वसीम अक्रम आणि मुरलीधरनसारख्या दिग्गजांना जमली नाही, ती कामगिरी भुवनने केली आहे.

अनोखा षटकार भुवनच्या नावे
भुवनेश्वरने चेंडू आणि यष्टीच्या माध्यमाने अनोखा षटकार आपल्या नावे केला आहे. डेव्हिड वॉर्नरला त्रिफळाचीत करून त्याने हा षटकार पूर्ण केला. आपल्या छोट्या आंतरराष्‍ट्रीय कारकीर्दीत भुवनने सहा फलंदाजांना क्लीन बोल्ड केले आहे.

डेव्हिड वॉर्नरची विकेट
भुवनेश्वरने डेव्हिड वॉर्नरला त्रिफळाचीत करून हा षटकार पूर्ण केला. भुवनच्या स्विंग होणार्‍या चेंडूवर नेहमी फलंदाज चकतात. यामुळे आतापर्यंत आपल्या छोट्या कारकीर्दीत त्याने 11 पैकी 6 विकेट क्लीन बोल्डच्या रूपाने घेतल्या आहेत.