आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राष्‍ट्रीय क्रीडा दिन विशेष: परीक्षा अंमलबजावणीत एकरूपता असणे गरजेचे !

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवाजी विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू (कै.) अप्पासाहेब पवार यांनी विद्यापीठांतर्गत क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास होण्यासाठी (कै.) मेघनाथ नागेशकर यांची नियुक्ती केली. आपले जीवन क्रीडा क्षेत्राला वाहून घेतलेल्या नागेशकरांनी प्रथम वर्षाच्या वर्गाला ‘कंपल्सरी फिजिकल एज्युकेशन’ची परीक्षा सुरू केली. त्याबरोबरच विभागीय व आंतरविभागीय स्पर्धेतून संघ निवडणे, विद्यापीठ संघाचे प्रशिक्षण शिबिर प्रत्येक विभागात राबवून विद्यापीठाच्या क्रीडा क्षेत्रात आदर्श निर्माण केला. संघ निवडण्यासाठी तज्ज्ञ शारीरिक शिक्षण संचालक नेमणूक बोर्ड ऑफ स्पोर्ट्स करते. या सुंदर पॅटर्नमुळे शिवाजी विद्यापीठ यात अग्रेसर आहे.


सोलापूर विद्यापीठाने याची अंमलबजावणी सुरुवातीपासूनच केली. नवीन क्रीडा धोरणाची अंमलबजावणी करताना शिवाजी विद्यापीठाने आखलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार राज्यातील सर्व विद्यापीठांत सक्तीच्या शारीरिक शिक्षण परीक्षांची अंमलबजावणी सुरू करावी, असे आदेश राज्य शासनाने नुकतेच काढले. परीक्षा ही पहिल्याच वर्षी नाही, तर द्वितीय व तृतीय वर्षासाठीही घ्यावी, असेही त्यात नमूद आहे. या परीक्षासंदर्भात राज्यातील सर्व विद्यापीठांत याची एकवाक्यता व एकसूत्रीपणा येण्यासाठी सर्व विद्यापीठांतील क्रीडाप्रमुख व तज्ज्ञांचे चर्चासत्र होणे गरजेचे आहे. तसेच सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांसह विनाअनुदानित महाविद्यालयातही शारीरिक शिक्षण संचालकांच्या नियुक्तीची अंमलबजावणी विद्यापीठाकडून होणे गरजेचे आहे.


महाराष्ट्रात असलेल्या 20 ते 25 टक्के महाविद्यालयांकडे काही प्रमाणात क्रीडांगणाची उपलब्धता आहे. नवीन शासन निर्णयानुसार अस्तित्वात महाविद्यालयांची क्रीडांगणे व प्राथमिक सुविधांची तपासणी व नवीन महाविद्यालयांनी याची पूर्तता केल्याशिवाय विद्यापीठाने परवानगी देऊ नये. तरच क्रीडा विकासास गती येईल.


महाराष्ट्राचे तत्कालीन राज्यपाल (कै.) डॉ. पी. सी. अलेक्झांडर यांनी राज्यांतर्गत पाच खेळांच्या आंतरविद्यापीठ अश्वमेध क्रीडा स्पर्धा घेण्याचा निर्णय घेतला. त्या स्पर्धा आजही सुरू आहेत. राज्य शासनाने या स्पर्धांतील सहभागी व प्रावीण्य मिळवलेल्या खेळाडूंचा नोकरीसाठी विचार करावा. राज्य विद्यापीठ क्रीडा मंडळ असले पाहिजे, हे क्रीडा विकासासाठी अंत्यत पूरक आहे.


- लेखक शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते आहेत.