आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताकडून खेळायला मिळेल असे वाटले नव्हते- महेंद्रसिंग धोनी

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चेन्नई- भारतीय क्रिकेट संघात मला कधी स्थान मिळेल व भारतासाठी खेळेन, असा साधा विचारही माझ्या मनामध्ये कधी आला नव्हता, असे टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याने म्हटले आहे.

प्रसिद्ध समालोचक हर्षा भोगले यांच्याशी एका पॅनेल चर्चेत धोनी म्हणाला, मी रांचीसारख्या एका छोट्या शहरातून आलो आहे. या शहरातच क्रिकेटचे धडे गिरवले. पण मला भारतीय संघात स्थान मिळेल व मी देशासाठी खेळेन असा साधा विचारही मनात कधी आला नव्हता. भारतीय संघात निवड होऊन देशाचे नेतृत्व करायला मिळणे हे माझे भाग्यच मी समजतो. मी एक सामना अथवा एखाद्या मालिकेचा विचार करीत नाही. मी सदैव भविष्याचा विचार करत असतो, असेही धोनी म्हणाला. या पॅनेल चर्चेत अनिल कुंबळे, भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक जॉन राईट यांचाही सहभाग होता.

धोनी म्हणाला, क्रिकेट हा एक आव्हानात्मक खेळ आहे. येथे अनेक चढ-उतार पाहायला मिळतात. माझ्याप्रमाणे देशाच्या वेगवेगळ्या भागातून भारतीय संघात खेळाडू देशासाठी खेळायला येतात. मी स्थानिक क्रिकेटमध्ये मेहनत घेतली व संघातील वरिष्ठ खेळाडूंशी एकनिष्ठ राहिलो, त्यामुळे पुढे सगळे ठीक घडत गेले. तरीही मी परिपूर्ण व तांत्रिकदृष्ट्या चांगला फलंदाज नाही. मात्र मानसिक कणखरतेमुळे मी यशस्वी ठरत गेलो. माझ्या यशामागे मी सतत आनंदी असणे हे सुद्धा कारण आहे. मी नेहमी भरपूर खातो, व्यायाम करतो व त्याचा मनापासून आनंद लुटतो त्यामुळेच मी कदाचित आनंदी दिसत असेन, असेही धोनीने स्पष्ट केले.