आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • New Captains, Second Test Starts Tomorrow At Brisben

नव्या कर्णधारांवर जबाबदारी ! दुसरी कसोटी उद्यापासून ब्रिस्बेनला रंगणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिस्बेन - अ‍ॅडिलेड कसोटीत दमदार प्रदर्शन केल्यानंतर आता सिडनीच्या मैदानावर यजमान ऑस्ट्रेलियाशी दोन हात करण्यास यंग इंडिया पुन्हा सज्ज झाली आहे. पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा ४८ धावांनी पराभव झाला. मात्र, युवा खेळाडूंच्या दमदार प्रदर्शनाने चाहत्यांची मने जिंकली. मालिकेत यजमान ऑस्ट्रेलिया संघ १-० ने पुढे असून ही आघाडी २-० करण्याच्या इराद्याने कांगारू मैदानावर उतरतील. या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी कर्णधार महेंद्रसिंग धोनी पुनरागमन करेल. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व स्टीव्हन स्मिथ करेल. दोन्ही संघांंचे नवे कर्णधार या कसोटीत नेतृत्व करणार असून, त्यांच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

नव्या उत्साहात कांगारू
कर्णधार मायकेल क्लार्क पहिल्या कसोटीतच जखमी झाला होता. जखमी असताना त्याने पहिल्या डावात शतक ठोकले. हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे तो मालिकेतून बाहेर झाला आहे. त्याच्या जागी युवा खेळाडू स्टीव्हन स्मिथकडे यजमान संघाचे नेतृ़त्व सोपवण्यात आले आहे. नवा भिडू... नव्या उत्साहासह कांगारूंचा संघ सिडनीच्या खेळपट्टीवर खेळेल. युवा स्मिथनेसुद्धा अ‍ॅडिलेड कसोटीत शतक ठोकून सामन्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

शॉन मार्शला संधी
जखमी मायकेल क्लार्कच्या जागी डावखुरा फलंदाज शॉन मार्शला ऑस्ट्रेलिया संघात सामील करण्यात आले आहे. शॉन मार्श तिस-या किंवा चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. क्लार्कच्या अनुपस्थितीत मधल्या फळीत दमदार प्रदर्शन करून संघातील स्थान निश्चित करण्याची चांगली संधी शॉन मार्शकडे असेल. शिवाय आयपीएलमध्ये भारतीयाविरुद्ध खेळण्याचा चांगला अनुभव मार्शकडून असून याचा फायदा त्याला होऊ शकतो.

अ‍ॅराेन की यादव? : अ‍ॅडिलेड कसोटीत भारताचा गोलंदाज वरुण अ‍ॅरोनला अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. तो या कसोटीत प्रचंड महागडा ठरला. त्याच्या जागी उमेश यादव किंवा धवल कुलकर्णी यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते.

अतिरेकी हल्ला; टीम इंडियाच्या सुरक्षेत वाढ
सिडनी | साेमवारी सिडनीतील अतिरेकी हल्ल्यामुळे भारतीय संघाच्या सुरक्षा व्यवस्थेत माेठी वाढ करण्यात आली. कसाेटी मालिकेसाठी भारतीय संघ आॅस्ट्रेलिया दाै-यावर आला आहे. हल्ला झाल्याच्या घटनेनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने लगेच क्रिकेट आॅस्ट्रेलियाशी (सीए) संपर्क साधला. तसेच संघाच्या सुरक्षेसाठी कडक बंदाेेबस्ताबद्दल बीसीसीआयने चर्चा केली, अशी माहिती सचिव संजय पटेल यांनी दिली. बीसीसीआय संपर्कात असल्याचेही त्यांनी सांगितले.

अश्विन, जडेजापैकी एकाला संधी
मागच्या सामन्यात टीम इंडियाने युवा लेगस्पिनर कर्ण शर्माला अंतिम अकरा खेळाडूंत स्थान दिले होते. मात्र, त्याला अपेक्षेनुसार कामगिरी करता आलेली नाही. त्याच्या जागी अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन किंवा रवींद्र जडेजा यांच्यापैकी एकाला अंतिम अकरा खेळाडूंत स्थान मिळू शकते. अश्विनच्या समावेशाने भारताला फलंदाजीतही फायदा होईल. मागच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा ऑफस्पिनर नॅथन लॉयनने १२ विकेट घेऊन लढतीचे चित्र बदलले होते. यामुळे या वेळी भारतीय संघात अश्विनच्या समावेशाची दाट शक्यता आहे.

दोन्ही संभाव्य संघ
भारत : महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), मुरली विजय, शिखर धवन, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन, ईशांत शर्मा, मो. शमी, उमेश यादव, वरुण अ‍ॅरोन, धवल कुलकर्णी.
ऑस्ट्रेलिया : स्टिवन स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, क्रिस रोजर्स, शेन वॉटसन, शॉन मार्श, ब्रेड हॅडिन, मिशेल मार्श, मिशेल जॉन्सन, पीटर सिडल, रेयान हॅरिस, नॅथन लॉयन.

खेळपट्टीवर गवत...
गाबाची खेळपट्टी आपल्या वेगासाठी प्रसिद्ध आहे. येथे नेहमी वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. भारत-ऑस्ट्रेलिया सामन्यासाठी आम्ही खेळपट्टीवर गवत ठेवले आहे.
- केविन मिशेल, पिच क्युरेटर.

स्मिथ ऑस्ट्रेलियाचा ४५ वा कर्णधार
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सोमवारी दुस-या कसोटीसाठी आपल्या संघाचा कर्णधार निवडला. निवड समितीचे सदस्य रोडनी मार्श म्हणाले, "ऑस्ट्रेलियाच्या कसोटी संघाचे कर्णधारपद मिळाल्यामुळे मी स्टीव्ह स्मिथचे अभिनंदन करतो. निवड समितीला त्याची कामगिरी, परिपक्वता आणि नेतृत्व क्षमतेवर विश्वास आहे.' स्मिथ ऑस्ट्रेलियाचा ४५ वा कसोटी
कर्णधार आहे.

धोनीच्या नेतृत्वावर लक्ष
विराट कोहलीने पहिल्या सामन्यात आक्रमक नेतृत्व केले होते. धावांचा पाठलाग करताना त्याच्या अ‍ॅप्रोचची विशेषत: स्तुती झाली. अशा परिस्थितीत धोनीच्या नेतृत्वशैलीवर या वेळी सर्वांच्या खास नजरा असतील. धोनी बहुतेक वेळी "वेट अँड वॉच'च्या रणनीतीनुसारच चालतो.