आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यंदा रणजी स्पर्धा चुरशीसाठी नव्या कल्पना, कुंबळे समितीने दिला प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कंटाळवाण्या होत चाललेल्या रणजी क्रिकेट स्पर्धेत अधिक चुरस निर्माण करण्याच्या दृष्टीने अनिल कुंबळे यांच्या अध्यक्षतेखाली काम करणाऱ्या तांत्रिक समितीने काही नावीन्यपूर्ण बदल सुचवले आहेत. गतवर्षीच्या ११५ रणजी सामन्यांपैकी फक्त ६२ सामनेच निकाली ठरले होते. हे कटू सत्य लक्षात घेऊन यंदाच्या हंगामात प्रत्येक दिवशी ९० ऐवजी ९५ षटकांच्या खेळाची शिफारस समितीने केली आहे. तसेच पहिल्या डावात आघाडी घेणारा संघ नंतर ‘ड्रॉ’साठीच खेळतो, हे लक्षात आल्यामुळे सामना अनिर्णीत राहिल्यास आघाडी घेणाऱ्या संघाचा एक गुण कमी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. भारताच्या काही भागांत अपुऱ्या प्रकाशामुळे काही वेळा ९० षटके अधिक कालावधीनंतरही टाकता येत नाहीत. त्यामुळे ९५ षटके पूर्ण होतील का? याबाबत प्रश्न आहे.

पहिल्या डावात आघाडी घेणाऱ्या संघास ३ गुण देण्यात येतात. मात्र, निर्णायक पराभव टाळल्याबद्दल प्रतिस्पर्धी संघालाही एक गुण देण्यास सुरुवात झाली आहे.
बीसीसीआयच्या कार्यकारिणीने कुंबळे समितीला एका महिन्यात अंतिम प्रस्ताव देण्यास सांगितले आहे.
गुणांमध्ये वाढ
अलीकडे विजयासाठीच्या गुणांमध्ये वाढ करण्यात आली. आता १० विकेटने किंवा डावाने विजय मिळवल्यास आणखी १ जादा गुणही देण्यात येतो. विजयासाठी ५ गुण अधिक एक बोनस गुण व १० विकेट मिळवल्यास अधिक एक गुण असे ७ गुण देण्यात येतात.

९५ षटके सक्तीची
ऑस्ट्रेलियाच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धेत प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये दिवसात ९६ षटकांचा खेळ होतो. त्याच धर्तीवर कुंबळे समितीने दिवसात ९५ षटकांचा खेळ अनिवार्य केला आहे. मात्र, दिवसाच्या खेळाचा तेवढाच अवधी ठेवण्यात आला आहे. त्यामुळे सामन्यातील २० षटके वाढतील आणि खेळही वेगवान होईल, असा तांत्रिक समितीचा दावा आहे. दिवसात ९० पेक्षा अधिक षटकांचा खेळ होऊ शकतो.