आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडचा क्रिकेटपटू जेसी रायडर कोमात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेलिंग्टन - न्यूझीलंडचा स्टार क्रिकेटपटू जेसी रायडरची प्रकृती अत्यंत नाजूक आहे. एका बारमध्ये झालेल्या भांडणात काही अज्ञात व्यक्तींनी त्याच्या डोक्यात शक्तिशाली प्रहार केल्याने गंभीर दुखापत झाली आहे. यामुळे तो कोमात गेला आहे. पुढच्या आठवड्यात सुरू होणा-या इंडियन प्रीमियर लीगच्या सहाव्या स्पर्धेत दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून सहभागी होण्यासाठी काही दिवसांत रायडर्स भारताकडे रवाना होणार होता. मात्र, त्यापूर्वीच ही दुर्दैवी घटना घडली.
वरिष्ठ पोलिस अधिकारी ब्रायन आर्चर यांनी याबाबत माहिती दिली. ‘या घटनेकडे बघून असे वाटते की जे.सी. रायडरसोबत खूप जोरदार मारहाण झाली आहे. या कारणानेच त्याच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली आहे. त्याची प्रकृती अत्यंत गंभीर होती. त्याला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या शरीराच्या इतर भागातही गंभीर दुखापती असल्याचे रुग्णालयात लक्षात आले,’ असे त्यांनी म्हटले.


घटनेची माहिती देताना आर्चर म्हणाले, ‘रायडर बारमध्ये आपल्या वेलिंग्टन येथील काही सहका-यांसोबत मद्यप्राशन करीत होता. यादरम्यान तीनपैकी दोन व्यक्तींनी रस्त्याच्या पलीकडे असलेल्या एका फास्ट फूड रेस्टॉरंटपर्यंत त्याचा पाठलाग केला आणि बहुदा त्यांच्यापैकीच कोणीतरी त्याला मारहाण केली. त्या व्यक्तीला भांडण करण्यास रायडरने उद्युक्त केले की नाही, हे आता सांगता येणार नाही,’ असेही त्यांनी नमूद केले. न्यूझीलंडच्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक रायडर असून, तो क्राइस्ट चर्च येथे सुरू असलेल्या देशांतर्गत स्पर्धेत वेलिंग्टनकडून खेळत होता.


सीसीटीव्हीची मदत
पोलिस त्या जागेवरील सर्व सीसीटीव्ही कॅमे-यांची पाहणी करीत आहे. घटनेत सामील असलेल्या व्यक्तींची अद्याप ओळख पटलेली नाही. न्यूझीलंडच्या या क्रिकेटपटूवर कोणत्या शस्त्राने वार करण्यात आला, याचा आम्ही सध्या शोध घेत आहोत. शिवाय आम्ही या घटनेच्या प्रत्यक्षदर्शींनासुद्धा पुढे येण्याचे आवाहन करीत आहोत, असे आर्चर यांनी सांगितले.


जेसी रायडरची आंतरराष्‍ट्रीय कारकीर्द
रायडरने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत 18 कसोटी सामन्यांत 40.93 च्या सरासरीने 1269 धावा काढल्या. यात त्याने 201 धावांची शानदार खेळीसुद्धा केली.


39 एकदिवसीय सामन्यात 34.37 च्या सरासरीने त्याने एक हजार धावा आपल्या नावे केल्या.
रायडर भारताविरुद्ध अधिक यशस्वी : रायडरने कसोटीत तिन्ही शतके भारताविरुद्ध ठोकली. 201 ही त्याची सर्वोच्च् खेळी ठरली आहे. भारताविरुद्ध त्याची सरासरी 60.10 अशी ठरली.


रायडर म्हणजे सदैव वादग्रस्त व्यक्ती
रायडरचे नाव यापूर्वीसुद्धा अनेक वादात अडकले आहे. एका मालिकेदरम्यान मद्यप्राशन केल्याच्या घटनेनंतर न्यूझीलंडच्या या डावखु-या फलंदाजाने स्वत: काही काळ आंतरराष्‍ट्रीय क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. मद्यप्राशन करण्याची त्याची सवय आणि याबाबतच्या बातम्या प्रसारमाध्यमांत आल्यानंतरही रायडरला ही सवय पुन्हा जडली आहे, असे काही दिवसांपूर्वी न्यूझीलंड क्रिकेट खेळाडू संघटनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेथ मिल्स म्हणाले.
2008 मध्येही रायडरने क्राइस्ट चर्च येथे एका बारच्या खिडकीवर आपले डोके जो-याने आपटले होते. यानंतर त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली आणि टाकेही लागले होते. या दुखापतीमुळे त्याला बरेच महिने संघाबाहेर राहावे
लागले होते.


मागच्या वर्षीही नॅपियर येथे संघाचा सहकारी डग बे्रसवेलसोबत एका बारमध्ये दारू ढोसल्यानंतर बार कर्मचा-यासोबत झालेल्या भांडणामुळे रायडर चर्चेत आला होता. नॅपियरच्या या प्रकरणानंतरच त्याने संघापासून दूर होण्याचा निर्णय
घेतला होता.