» No Followon ,Mumbai In Second Inning

फॉलोऑन न देता मुंबईची दुस-या डावात फलंदाजी

दिव्य मराठी नेटवर्क | Jan 10, 2013, 01:58 AM IST

  • फॉलोऑन न देता मुंबईची दुस-या  डावात फलंदाजी

मुंबई - पहिल्या डावातील आघाडीच्या बळावर रणजी उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित झाल्यानंतर निश्चिंत झालेल्या मुंबईने बडोदे संघावर फॉलोऑन न लादता दुस-या डावात फलंदाजी करणे पसंत केले. दुस-या डावात चौथ्या दिवसअखेर 1 बाद 171 अशी दमदार मजल मारणा-या मुंबईची एकूण आघाडी 545 धावांची झाली असून उद्या कोणत्याही क्षणी डावाची घोषणा अपेक्षित आहे.

तीन शतकवीरांनी पहिल्या डावात मुंबईला 645 धावांचा डोंगर उभा करून दिल्यानंतर दाभोळकर (88 धावांत 3 बळी), अंकित चव्हाण (56 धावांत 2 बळी), जावेद खान (27 धावांत 2 बळी), धवल कुलकर्णी (58 धावांत 2 बळी) यांनी बडोद्याचा पहिला डाव 271 धावांत गुंडाळला.

अपेक्षेप्रमाणे मुंबईने बडोद्याला फॉलोऑन न देता दुस-या डावात फलंदाजी सुरू केली. कौस्तुभ पवार (नाबाद 70) व हिकेन शहा (नाबाद 65) यांनी वासिम जाफर (33) बाद झाल्यानंतर मुंबईची धावसंख्या 171 पर्यंत वाढवली.
चौथ्या दिवशी वानखेडे स्टेडियमच्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांचे चेंडू अधिक वळत होते, तरीही मुंबईने रणजी स्पर्धेतील यापुढील लढती लक्षात घेऊन आपल्या नवोदित फलंदाजांना अधिक फलंदाजीचा सराव व्हावा यासाठी दुस-या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अखेरच्या दिवशी खेळपट्टी अधिक धोकादायक होईल, हे लक्षात घेऊनही मुंबईने बडोद्याला आज फॉलोऑन दिला नाही.

Next Article

Recommended