आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लढवय्या धोनी नेतृत्व सोडणार नाही, रवी शास्त्रींच्या सूत्रांनी दिलेली माहिती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारताचा कप्तान महेंद्रसिंग धोनी सध्या अडचणीत आला आहे. बांगलादेशविरुद्ध मालिका गमावणे हे केवळ निमित्त आहे. नेतृत्व करताना दुहेरी हितसंबंध जपल्याचा आरोपही आता अधिक तीव्रतेने करण्यात येत आहे. धोनीने भारतीय संघाचे कप्तानपद सोडावे म्हणून त्याच्यावर प्रचंड दबाव येत आहे. बीसीसीआयच्या अध्यक्षांनी दुहेरी हितसंबंध जपल्याबाबत बीसीसीआयची चौकशी सुरू असल्याचे विधान केले. दुसर्‍या दिवशी दालमियांना त्याचे विस्मरण झाले. त्या दडपणातून बाहेर पडतो न पडतो तोच धोनीने भारतीय उपखंडात प्रथमच मालिका गमावल्यामुळे त्याचा राजीनामा मागणारा गट सक्रिय झाला आहे. धोनी हा लढवय्या आहे. त्याने भारतीय कसोटी संघाचे नेतृत्व स्वत:हून, अनपेक्षितपणे सोडून सर्वांना धक्का दिला होता. मात्र जेव्हा जेव्हा धोनीच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली, त्या वेळी तो पुन्हा एकदा वर उसळून आला होता.

धोनीचे निकटवर्तीय आणि भारतीय संघाचे सध्याचे संचालक रवी शास्त्री यांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धोनी ‘फायटर’ आहे. तो दडपण आणले म्हणून नेतृत्व सोडणार नाही, उलट आपली उपयुक्तता सिद्ध करण्यासाठी अधिक कणखर होईल. या विधानाची प्रथम प्रचिती म्हणजे त्याने स्वत:ला सहाव्या क्रमांकावरून चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आणणे ही आहे.

धोनीला एक गोष्ट चांगलीच ज्ञात आहे, ती म्हणजे आपल्या नावावर अधिकाधिक धावा लागल्या की सर्वांनाच चोख प्रत्युत्तर देता येईल. त्याने रैनाला खाली सहाव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवले. रवी शास्त्री म्हणत होते, धोनीची नेतृत्व सोडण्याची इच्छा नाही. पराभूत होऊन तर त्याला मुळीच निवृत्त व्हायचे नाही. मात्र स्वत: धोनीने एक गोष्ट स्पष्ट केली आहे, ती म्हणजे त्यांना मी कप्तान म्हणून नको असेन तर ठीक आहे. मी यष्टिरक्षक व खेळाडू म्हणूनही खेळायला तयार आहे.

धोनीचे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी जसे त्याच्या आक्रमक व काहीतरी करून दाखवण्याचे एक लक्षण आहे, त्याप्रमाणेच त्याने एकेरी धाव काढताना मध्ये येणार्‍या गोलंदाजाला खांदा मारून ढकलणे, हे धावांसाठी तो सध्या किती भुकेला आहे, याचे द्योतक आहे.

कर्णधारपदाची एकदिवसीय क्रिकेटमधील धोनीची भूक संपलेली नाही. त्याचे आणखी एक उदाहरण म्हणजे अजिंक्य रहाणेला, तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये उपयुक्त नाही, असे म्हणून वगळणे हे आहे. धोनीला नेतृत्वासाठी अन्य कुणाचे आव्हान नको आहे. त्याने सेहवाग, गौतम गंभीर यांना जसे दूर केले तशीच नीती तो अजिंक्य रहाणेच्या बाबतीतही वापरत आहे, असा तज्ज्ञांचा कयास आहे.

श्रीनिवासन यांचा सध्या वरदहस्त नसल्यामुळे धोनी आपल्या कामगिरीच्या बळावर आपली बाजू सर्वांसमोर मांडू इच्छितो, असेही सुत्रांनी सांगितले.

कोहली तयार नाही
धोनीला आणखी एक गोष्टही ठाऊक आहे. ती म्हणजे विराट कोहली एकदिवसीय क्रिकेटचे नेतृत्व स्वीकारण्यास सध्या तरी तयार नाही. विराटची स्वत:चीच फलंदाजी सध्या चांगली नाही. अशा परिस्थितीत त्याला कप्तानपदाचे दडपण स्वत:वर वाढवून घ्यायचे नाही.

धोनीचे स्थान पक्के
या घडीला धोनीचे यष्टिरक्षक म्हणून स्थान घेऊ शकेल असा त्याच्यापेक्षा तरुण असलेला यष्टिरक्षक नाही. धोनीला निव्वळ फलंदाज म्हणूनही भारतीय संघात स्थान सहज मिळवता येईल.

पुढे वाचा, धोनीच नेतृत्वासाठी योग्य; पायउतार होण्याची गरज नाही...