आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...तर वर्ल्डकपमध्ये दोन विश्वविजेते!, फायनलमध्ये सुपर ओव्हर बंद; दोघांना संयुक्त विजेतेपद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - विश्वचषकाच्या इतिहासात प्रथमच विजेतेपद विभागून दिले जाणार आहे. दुबईतील बैठकीत आयसीसीने बाद फेरीचे सामने बरोबरीत सुटल्यास सुपर ओव्हर न खेळवण्याचा निर्णय घेतला. उपांत्यपूर्व व उपांत्य फेरीचे सामने बरोबरीत सुटल्यास वा ‘टाय’ झाल्यास गटात वरच्या क्रमांकावर राहिलेल्या संघाला विजयी घोषित करण्यात येईल.

अंतिम फेरीचा सामना मात्र ‘टाय’ झाल्यास दोन्ही संघांना संयुक्त विजेतेपद दिले जाईल किंवा सहविजेते घोषित करण्यात येईल. आयसीसीच्या शतकाहून अधिक पुरातन असलेल्या क्रिकेट इतिहासात असे प्रथमच घडत आहे. याआधी ‘टाय’ सामन्यानंतर कोंडी फोडण्यासाठी ६ चेंडूंच्या सुपर ओव्हरचा प्रयोग करण्यात आला होता. या वेळी भारताचा प्रखर विरोध असूनही यंदाच्या विश्वचषकातील सर्वच्या सर्व म्हणजे ४९ सामन्यांसाठी डिसिजन रिव्ह्यू सिस्टिम (डीआरएस)चा वापर करण्यात येणार आहे. भारताने आतापर्यंत स्वगृही झालेल्या व परदेशात झालेल्या मालिकांमध्ये ‘डीआरएस’चा वापर केला नाही.

यंदाच्या विश्वचषकात साखळी सामन्यांसाठी राखीव दिवस नसेल, मात्र बाद फेरीच्या सर्व सामन्यांसाठी राखीव दिवस ठेवण्यात आला आहे, असेही या वेळी झालेल्या बैठकीत निश्चित करण्यात अाले.
बक्षिसांच्या रकमेत २० टक्क्यांनी वाढ!
या स्पर्धेच्या पुरस्कारांच्या रकमेत २० टक्क्यांनी वाढ करण्यात आली. मागील स्पर्धेत (२०११) विजेत्यांना ३२ लाख ५० हजार अमेरिकन डॉलर्स मिळाले होते. २०१५ च्या विजेत्यांना ३७ लाख ५० हजार अमेरिकन डॉलर्स मिळतील. उपविजेत्यांना १७ लाख ५० हजार डॉलर्स, उपांत्य पराभूत संघास प्रत्येकी ६ लाख डॉलर्स मिळतील. साखळी सामना विजयी संघास प्रत्येक विजयाबद्दल ४५ हजार डॉलर्स मिळतील. साखळी लढतीतून बाहेर जाणाऱ्या संघांना प्रत्येकी ३५ हजार मिळणार अाहेत.