औरंगाबाद - देशात क्रिकेटला अफाट लोकप्रियता असल्याने क्रिकेटला नाही, तर खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची गरज असल्याचे मत भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांनी व्यक्त केले. कमी षटकांच्या स्पर्धा, आयपीएल आणि टी-२० स्पर्धा क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करून खेळाडूंचे भविष्य धोक्यात आणले जात असल्याचेही ते म्हणाले.
व्हेरॉक शालेय आणि औद्योगिक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनासाठी ते शहरात आले असून गुरुवारी त्यांनी आयोजकांशी संवाद साधला. देशात क्रिकेटला चालना देण्यासाठी अनेक व्यक्ती पुढे येतात, मात्र खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याकडे दुर्लक्ष करतात. मैदानावर मेहनत घेणा-या ग्रामीण भागातील आणि गरीब, होतकरू खेळाडूंना मदत करणे गरजेचे आहे. आताचे क्रिकेट कमी कमी षटकांचे होत चालले आहे. ते युवा खेळाडूंसाठी धोकादायक आहे. सचिन, गांगुली, द्रविड, लक्ष्मण यांच्या काळात खरे क्रिकेट खेळले जात होते. तेव्हाचा संघही सर्वोत्कृष्ट होता. याचे मुख्य कारण म्हणजे तेव्हा टी-२० क्रिकेट नव्हते, असे बेदी म्हणाले. आयपीएल, टी-२० क्रिकेटपासून नवोदित खेळाडूंनी दूर राहायला हवे, असा सल्ला बेदी यांनी दिला.
प्रशासक पैशाच्या मागे
सध्या क्रिकेटचे प्रशासक पैशाच्या मागे धावत आहेत. त्यांना क्रिकेटचे होत असलेले नुकसान दिसत नाही. कमी षटकांच्या स्पर्धेचे आयोजन करून खेळाडू तयार होत नाहीत. केवळ त्यातून पैसा कमवता येतो. आयोजकांनी चार दिवसांच्या स्पर्धा घ्याव्यात, असेही बेदी म्हणाले.
आज उद्घाटन : व्हेरॉक औद्योगिक व शालेय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भारताचे माजी कर्णधार बिशनसिंग बेदी यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी ९.३० वा. एडीसीएवर होईल, अशी माहिती व्हेरॉकचे उपाध्यक्ष एम. पी. शर्मा यांनी दिली.