आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळण्‍यासाठी मिळालेली संधी दवडणार नाही - शिखर धवन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - टीम इंडियात आगामी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेसाठी निवड झालेला सलामीवीर शिखर धवनचा आत्मविश्वास सध्या बुलंदीवर आहे. ही संधी मी कोणत्याही परिस्थितीत दवडू इच्छित नाही. मला संधीचे सोनेच करायचे आहे, अशी प्रतिक्रिया शिखरने व्यक्त केली. 22 फेब्रुवारीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणा-या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन लढतीसाठी त्याची निवड झाली आहे.

धवन म्हणाला, ‘मागच्या वर्षी वेस्ट इंडीज दौ-यावर माझी निवड झाली होती. त्या वेळी भारतीय संघात स्थान पक्के न करू शकल्यामुळे मी दुस-या कोणाला दोषी मानत नाही. मी सलगपणे चांगली कामगिरी करू शकलो नाही. यामुळेच मी पाचपेक्षा जास्त वनडेत खेळू शकलो नव्हतो. मात्र, या वेळी मी मिळालेल्या संधीला दवडणार नाही.’ त्या वेळी पाच वनडेत धवनने 69 धावा काढल्या होत्या. यात एका अर्धशतकाचा समावेश आहे.

शतकामुळे गणित जमले
सराव सामन्यात इंग्लंडविरुद्ध नाबाद 110 धावा काढल्याचा फायदा झाला, असे शिखर धवनचे मत आहे. आंतरराष्‍ट्रीय गोलंदाजांसमोर धावा काढल्याने आत्मविश्वास वाढतो. स्टीफन फिन, जेड डर्नबॅच, स्टुअर्ट मिकर, जेस ट्रेडवेलसमोर खेळताना मला अडचण आली नाही, असेही त्याने म्हटले.

परिस्थिती बदलली
मागच्या 2010-11 च्या सत्रात रेल्वेविरुद्ध दिल्लीकडून खेळताना शिखर बेजबाबदार फटक्यावर बाद झाला. विजयासाठी 136 धावांचा पाठलाग करताना दिल्लीचा पराभव झाला. त्या सामन्यात माझ्यावर जेवढी टीका झाली तशी यापूर्वी कधीही झाली नव्हती. त्या सामन्यानंतर माझा दृष्टिकोनच बदलला. यामुळे महाराष्‍ट्राविरुद्ध 270 धावांचा पाठलाग करताना माझ्या फलंदाजीने सामना जिंकला. यामुळे मी खुश आहे, असे तो म्हणाला.

5679 धावा काढल्या आहेत शिखरने
शिखर धवनने 81 प्रथम श्रेणीच्या सामन्यात आतापर्यंत 5679 धावा काढल्या आहेत. वाईट कामगिरीसाठी कसलेच कारण सांगत नाही. वेस्ट इंडीजमधल्या खेळपट्ट्या संथ होत्या. चेंडू बॅटवर सहजपणे येत नव्हता. मी धावा काढायला हव्या होत्या, असेही तो म्हणाला.

या सत्रात मी चार प्रथमश्रेणी शतकांसह 833 धावा काढल्या. यामुळे मला निवडीचा विश्वास होता, असे त्याने म्हटले. इराणी ट्रॉफीपूर्वी माझ्या डोक्यात निवडीचा विचार नव्हता. कारण अशी कामगिरी मी यापूर्वी अनेक वेळा केली आहे.
मी खुलून फलंदाजी केली आणि शतकसुद्धा काढू शकलो असतो. या सत्रात मी सलगपणे चांगली कामगिरी केली आहे, असेही शिखरने नमूद केले. आता ऑस्ट्रेलियाची टीम चांगली आहे. गोलंदाजही जबरदस्त आहे. मात्र, यांचा समर्थपणे सामना करण्यास मी सज्ज आहे. ही संधी व्यर्थ घालवणार नाही.