आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी निवड न होणे नवीन नाही : जाफर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - टीम इंडियात माझी निवड न होणे, हे काही नवीन नाही. मी सलगपणे चांगली कामगिरी करीत आहे.चहापानाच्या वेळी संघाची निवड झाल्याची मला माहिती मिळाली त्या वेळी मी 74 धावांवर खेळत होतो. मी हताश झालो नाही आणि शेष भारताविरुद्ध फायनलमध्येसुद्धा नाबाद शतक ठोकले, अशी प्रतिक्रिया मुंबईचा सलामीवीर वसीम जाफरने व्यक्त केली.

सातत्याने चांगली कामगिरी करूनही ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिल्या दोन कसोटींसाठी जाफरची निवड होऊ शकली नाही. मुरली विजय, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे यांची सलामीवीर म्हणून निवड करण्यात आली. मात्र, जाफरच्या नावावर चर्चासुद्धा झाली नाही. 16 फेब्रुवारी रोजी वयाची 35 वर्षे पूर्ण करणारा जाफर म्हणाला, ‘मी इतकेच म्हणू शकतो की, केवळ धावा काढत राहीन आणि संघात पुनरागमनासाठी वाट बघेन.’ जाफरने इराणी ट्रॉफीत शानदार कामगिरी करताना पहिल्या डावात 80 आणि दुस-याडावात नाबाद 101 धावा काढल्या होत्या.

‘संघात निवड न होण्याची मला जवळपास सवयच झाली आहे. मला सर्व जण बोलत होते की, संघात माझी निवड केली जाईलच. मात्र, मी यावर विचार करून माझे लक्ष विचलित होऊ देत नाही. मी केवळ आपल्या खेळावर लक्ष केंद्रित करायचे होते आणि ते मी केले,’ असे जाफर म्हणाला. मला फलंदाजी करायला आवडते. मला धावा काढण्यास आणि विजयात आनंद मिळतो. मात्र, जे माझ्या हाती नाही, नियंत्रणात नाही त्यावर मी काहीच बोलू शकत नाही. माझी संघात निवड का झाली नाही, यावर विचार करू लागलो तर याचा माझ्या कामगिरीवर नकारात्मक परिणाम पडेल, असेही त्याने नमूद केले.

जाफरने भारतासाठी 31 कसोटी सामने खेळताना 1944 धावा काढल्या. मी कठोर मेहनत घेत आहे, असे मी म्हणेन तर ते योग्य होणार नाही. राष्ट्री य संघात स्थान मिळवण्यासाठी प्रत्येक खेळाडू कठोर मेहनत घेतच असतो. मुंबई संघाचा सदस्य असल्याचा मला अभिमान वाटतो, असेही त्याने स्पष्ट केले.

शानदार फॉर्मानंतरही डावलले
वसीम जाफरने रणजी सत्रात शानदार कामगिरी केली. रणजी फायनलमध्ये सौराष्ट्राविरुद्ध त्याने 132 धावांची शानदार खेळी केली होती. क्वार्टर फायनलमध्येही त्याने बडोद्याविरुद्ध 150 धावा ठोकल्या. या सत्रात जबरदस्त फलंदाजी करून रणजीत सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज ठरला आहे.