आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑलिम्पिक स्पर्धा : सायना करणार पाचसदस्यीय भारतीय संघाचे नेतृत्व

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानावर असलेली भारतीय स्टार सायना नेहवाल लंडन आॅलिम्पिकमध्ये पाचसदस्यीय बॅडमिंटन संघाचे नेतृत्व करणार आहे. येत्या 27 जुलैपासून लंडन येथे आॅलिम्पिक स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. 1992 मध्ये बॅडमिंटनला आॅलिम्पिक खेळामध्ये सहभागी करण्यात आले आहे. त्यानंतर भारताकडून आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणारा हा सर्वात मोठा संघ असणार आहे.
सुपरफास्ट सायनाचे यश - सुपरफास्ट असलेल्या सायना नेहवालने यंदाच्या मोसमात विजयाचा सिलसिला अबाधित ठेवला. स्विस ओपनसह थायलंड ओपन व इंडोनेशिया ओपन स्पर्धेचा चषक तिने निर्विवादपणे जिंकला. गेल्या चार वर्षांतही तिने अनेक किताब आपल्या नावे केले आहेत. यामध्ये 2009, 2010 व 2012 मध्ये इंडोनेशिया ओपन, 2010 मध्ये सिंगापूर ओपन व हाँगकॉँग ओपन सुपर सिरीजचा किताब पटकावला. तसेच सुपर सिरीज मास्टर्सचे जेतेपदही तिने आपल्या नावावर नोंदवले आहे. त्यासह 2010 कॉमनवेल्थ गेममध्ये सुवर्ण व इंडियन ग्रांप्री. व 2012 मध्ये स्विस ओपन ग्रांप्री. स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे.
सायनासह दुसरीकडे संघातील पी.कश्यप, ज्वाला गुट्टा व आश्विनी पोनप्पा देखील जबरदस्त फॉर्मात आहे. गेल्या महिन्यात झालेल्या थायलंड ओपनमध्ये पी.कश्यपने अनपेक्षित कामगिरीचे प्रदर्शन केले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंतचा पल्ला त्याने रोमहर्षक विजयाची नोंद करत गाठला होता. एकंदरीत या धडाकेबाज प्रदर्शनातून त्याने पदकाच्या आशा पल्लवीत केल्या आहेत. पुरुष एकेरीतील पदकाची मदार त्यावर असणार आहे. तसेच ज्वाला व आश्विनी या दोघींनाही पदकाची आशा आहे. महिला दुहेरीत आपण अपूर्व अशी कामगिरी करून दाखवू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.
सुवर्णपदक मिळवणार : सायना - भारताला सुवर्णपदक मिळवून देण्याचे माझे स्वप्न अवघ्या काही अंतरावर आहे. हे ध्येय गाठण्यासाठी मी अधिकच उत्सुक आहे. त्यासाठी माझा जोरदार सराव सुरू आहे. केलेल्या अखंड साधनेतुन मला सहजरित्या यश मिळेल. देशवासियांच्या आशा माझ्या पाठीशी आहेत. त्यामुळे मला निश्चित यश मिळेल असेही सायना म्हणाली.