आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Olympians Express Shock Over Randhir Singh Abhay Chautala Alliance

रणधीरसिंग यांच्या नजीकचे आयओएमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - भारतीय ऑलिम्पिक संघातील भाऊबंदकी संपुष्टात आली असून रणधीरसिंग आणि अभयसिंह चौटाला यांनी विरोधाची आपापली शस्त्रे खाली ठेवल्यामुळे येत्या दोन महिन्यांत आयओसीची बंदी उठवली जाण्याची शक्यता आहे. आपली मुलगी सुनयना कुमारी संयुक्त सचिव (लॉन बॉलिंग), अनिल खन्ना-कोशाध्यक्ष (टेनिस), जनार्दनसिंग गेहलोत (उपाध्यक्ष) यांनी आयओएच्या कार्यकारिणीवर वर्णी लावण्यात यशस्वी ठरलेल्या रणधीरसिंग यांचा विरोध आता अचानक मावळला आहे. दुसरीकडे अभयसिंह चौटाला यांनी आपलीच माणसे आयओएवर आणून त्यांचा रिमोट आपल्या हाती ठेवून तहाची बोलणी यशस्वी केली आहेत.

त्यामुळे राष्ट्रकुल घोटाळ्यानंतर भारतीय क्रीडा क्षेत्रात आलेले आयओएवरील बंदीचे दुसरे वादळही आता शांत झाले आहे. मोजक्याच शिलेदारांना घेऊन अभयसिंह चौटाला यांच्याशी टक्कर देणार्‍या रणधीरसिंग यांची शक्तीही क्षीण झाली आहे. रणधीरसिंग बरोबरच्या भांडणात हाती असलेली आयओएवरील वर्चस्वाची किल्लीही गमावण्याचा धोका अभयसिंह चौटाला यांनाही स्पष्ट दिसत होता. त्यामुळे रणधीरसिंग यांच्या माणसांना आयओएमध्ये स्थान देऊन त्यांनी स्वत:च्या माणसांनाही आत आणले आहे. के. पी. सिंगदेव यांची पत्नी राजलक्ष्मी हिच्या उपाध्यक्षपदावर उभे राहण्याच्या अट्टहासापायी येत्या 9 फेब्रुवारी रोजी आयओएला निवडणूक घ्यावी लागेल. अन्यथा रामचंद्रन यांच्या अध्यक्षपदाखाली नवी कार्यकारिणी मंजुरीसाठी पाठविण्यात आली असती.

अखेर रणधीरसिंगला यश
रणधीरसिंग यांनी मंत्रालय व क्रीडा मंत्री आदींच्या साथीने चौटाला यांना आयओएची सत्ता ग्रहण करण्यापासून रोखले होते. चौटाला व भानोत यांना आचारसंहितेच्या आधारे बाहेर ठेवण्यात रणधीरसिंग यांना अखेरीस यश आले आहे.

चौटालांसोबत तह
सत्ता हातून जाऊ नये म्हणून चौटाला यांनी अखेर रणधीरसिंग यांच्याशी तह केला. या दोघांच्या भांडणात फक्त भारतानेच ‘चार्जशीट’ असणार्‍यांना निवडणुकीला उभे राहू न देण्याच्या मुद्दय़ाला सहमती दर्शवली. आयओसीच्या 200 हून अधिक सदस्य देशांपैकी किती जण या कायद्याचे पालन करतात हा निर्माण झालेला यक्षप्रश्न आहे.