आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
लंडन ऑलिम्पिक एका आठवड्यानंतरही स्टेडियममध्ये खच्चून प्रेक्षक भरू शकले नाही. आयोजकांनी पत्रकारांच्या कायम रिक्त राहणा-या सीट्स विकायला सुरुवात केली आहे. मात्र, ऑलिम्पिक व्हीआयपी पाहुण्यांच्या सन्मानिकांना त्यांना हात लावता येत नाही. 204 देशांच्या ऑलिम्पिक संघटनांच्या अधिका-यांना दिलेल्या सन्मानिका किंवा त्या सन्मानिकांच्या जागा त्यांना काढून घेण्यात यश आले नाही. त्यामुळे स्टेडियम्स अजूनही मोकळी दिसताहेत.
सारं काही विकलं जाणार
स्टेडियम्स मोकळी असली तरीही आयोजन समितीच्या लंडन ऑलिम्पिकच्या स्मृतिचिन्हांच्या विक्रीची कल्पना हिट ठरली आहे. क्रीडाज्योतीच्या प्रतिकृतींपासून अॅथलेटिक्समधील बॅटनपर्यंत वापरण्यात आलेल्या वस्तूंचा लिलाव करण्यात येणार आहे. एवढेच नव्हे, ऑलिम्पिक वस्तूंची वाढती मागणी लक्षात घेऊन आयोजन समितीने आता काही ऐतिहासिक स्पर्धा, लढती यांच्या स्कोअरशीट्सचाही लिलाव करण्याची योजना आखली आहे.
भारतीय नेमबाजांची विदेशींना भुरळ
लंडन - ऑलिम्पिकमधील भारतीय शूटर्सच्या यशाचे पडसाद जगात सर्वत्र उमटायला लागले आहेत. बेरेट्टा या इटालियन कंपनीने नॅशनल रायफल असोसिएशनबरोबर करार केला. या करारानुसार रिओ येथील आगामी ऑलिम्पिकपर्यंतच्या भारतीय स्पर्धकांच्या रायफलचा, प्रशिक्षणासाठीचा आणि अन्य गोष्टींचा खर्च बेरेट्टा करणार आहे. बेरेट्टाचे ब्रिटनचे प्रतिनिधी रवींदरसिंग यांनी याबाबत माहिती देताना सांगितले, ‘क्ले टार्गेट शूटिंग या प्रकारातील भारताच्या सहाही स्पर्धकांना बेरेट्टातर्फे रायफल देण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारी काडतुसे रायफल संघटनेमार्फत देण्यात येणार आहेत. प्रशिक्षण आणि अन्य साहित्यही बेरेट्टा देणार आहे. त्याशिवाय 2013 पासून बेरेट्टा गोल्ड कप ही जगप्रसिद्ध स्पर्धा आम्ही भारतातही सुरू करणार आहोत.’ शूटिंग हा खेळ प्रेक्षकांना कमी आकर्षित करतो, त्यासाठी तुम्ही काय करणार आहात, या प्रश्नावर रविंदरसिंग म्हणाले, ‘तुम्ही लंडनमध्ये क्ले टार्गेट शूटिंग मुद्दाम पाहा. प्रेक्षक अधिक आकर्षित व्हावेत या दृष्टीने आम्ही केलेले बदल तुम्हाला पाहायला मिळतील. आता क्ले टार्गेट फुटल्यानंतर रंगीत धूर निघतो, वेगवेगळे रंग पाहून प्रेक्षकही खुश होतात.’
बेरेट्टाने पुण्याच्या बालेवाडी येथील शूटिंग रेंजची निवड विश्वकपसाठी केली आहे. रवींदरसिंग त्यामुळे पुण्याला वारंवार येतात.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.