आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Olympic News In Marathi, India\'s Olympic Comeback Issue, Divya Marathi

भारताचे ऑलिम्पिक पुनरागमन; निलंबन मागे, खेळाडूंमध्ये जल्लोष

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- एका प्रदीर्घ प्रतीक्षेचा शेवट झाला आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेने भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या (आयओए) नुकत्याच झालेल्या निवडणुकीवर समाधान व्यक्त करताना निलंबन हटवले आहे. तब्बल 14 महिन्यांनंतर भारताचे ऑलिम्पिक पुनरागमन झाले आहे. एखाद्या ऑलिम्पिक स्पध्रेदरम्यानच राष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवरील बंदी दूर होण्याची ही इतिहासातील पहिलीच घटना ठरली. भारतीय ऑलिम्पिक संघटनेला निलंबन हटवत असल्याची माहिती दूरध्वनीवर देण्यात आली.
आयओसीने एक पत्रक जाहीर करून ही माहिती दिली. त्यांच्या कार्यकारी मंडळाची रशियाच्या सोची येथे एक विशेष बैठक झाली. यात भारतावरील निलंबन हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. सोचीत सध्या हिवाळी ऑलिम्पिक सुरू आहे.
अहवाल बघून निर्णय
आयओएच्या निवडणुकीत पर्यवेक्षक म्हणून रॉबिन मिचेल यांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ भारतात आले होते. या शिष्टमंडळाने सोचीत आयओसीला सकारात्मक अहवाल सादर केला.
14 महिन्यांपूर्वी निलंबन
आयओएच्या 4 डिसेंबर 2012 रोजी झालेल्या निवडणुकीत कलंकित व्यक्तींना निवडल्यामुळे आक्षेप घेताना आयओसीने भारताला ऑलिम्पिकमधून निलंबित केले होते.
सोचीत जल्लोष
भारतावरची बंदी हटवण्यात आल्याने सोची हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झालेल्या शिव केशवन, हिमांशू ठाकूर आणि नदीम इक्बालने जल्लोष करून आनंदोत्सव साजरा केला. या तिघांना 7 फेब्रुवारी रोजी ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात पथसंचलनामध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेच्या ध्वजासह सहभागी व्हावे लागले होते.
आता पुढे काय ?
निलंबन हटल्यामुळे या वर्षी ग्लासगो येथील राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा आणि इचियोन येथे होणार्‍या आशियाई क्रीडा स्पध्रेत भारतीय खेळाडू आता तिरंगा घेऊन जिंकण्यासाठी खेळू शकतील. आयओएचे नवे महासचिव राजीव मेहता यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आम्हाला आयओसीने दूरध्वनीवर भारतावरील निलंबन दूर केल्याची सूचना देण्यात आली, असे त्यांनी सांगितले.
निलंबनाचे कारण
आयओएच्या निवडणुकीत कलंकित अधिकारी अभयसिंग चौटाला यांना अध्यक्ष आणि ललित भनोत यांना महासचिव म्हणून निवडण्यात आले आहे. दिल्ली कॉमनवेल्थ गेम्समधील घोटाळ्याच्या आरोपात भनोत तुरुंगात जाऊन आले आहेत. या अधिकार्‍यांच्या निवडीवर आयओसीने जोरदार आक्षेप घेतला होता. आयओसीचे न ऐकल्यामुळे भारताला निलंबनाची शिक्षा भोगावी लागली.
महत्त्वाचा निर्णय
हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे. आता आम्ही तिरंग्यासह आंतरराष्ट्रीय स्पध्रेत सहभागी होऊ शकतो. सुशीलकुमार, ऑलिम्पिक पदक विजेता.
14 महिने भारतीय खेळाडू आयओसी झेंड्याखाली खेळले
14 महिन्यांनंतर निलंबन मागे